पुणे : पायभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत प्रगती करत आहे; मात्र भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची सध्या नितांत गरज आहे. त्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी संशोधन संस्थांशी करार करून संशोधन संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी मंगळवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘अवकाश विज्ञान’ (स्पेस सायन्सेस) या विषयातील तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जॉर्ज जोसेफ, उपग्रह कार्यक्रमाचे संचालक डॉ. शिवकुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सौमेक रॉयचौधरी, ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स’चे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, स्थानिक समन्वयक डॉ. पी. प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले की, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. पायाभूत सुविधा देशात उपलब्ध आहेत. सध्या विविध महत्त्वाचे मिशन हाती घेण्यात आले आहेत आणि ती कमी वेळात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पूर्वी एखाद्या मिशनचे पाच-पाच वर्षांचे नियोजन असायचे, ते आता केवळ दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेतले जाते. त्यासाठी आता विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात जोडून घ्यावे लागेल. या प्रकारच्या गुंतवणुकीत पुरेशी वाढ करण्याची गरज आहे.डॉ. सिवन यांनीही कुशल मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, भारताचा २०२५ पर्यंतचा काळ महत्त्वाच्या अवकाश मोहिमांचा असणार आहे. चांद्रयान मोहिमेबरोबरच सूर्यवलयाचा अभ्यास करणारे ‘आदित्य मिशन’, मंगळयान-२, २०२३ साली शुक्र ग्रहाबाबत ‘व्हीनस मिशन’, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा संशोधन करणारे ‘गगनयान’, एटमॉस्फेरित सायन्सेसच्या (वातावरणीय शास्त्र) अनुशंगाने ‘दिशा १’ व ‘दिशा २’ अशा विविध मोहिमा नियोजित आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आतापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे.सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रदेशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात ‘इस्रो’कडून सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे अवकाश विज्ञानात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळ व मार्गदर्शन दिले जाईल. आगरतळा येथील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी आणि जालंधर येथे प्रत्येकी एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जातील, असे डॉ. सिवन यांनी सांगितले.
अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज- कस्तुरीरंगन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:06 AM