पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू यांनी समाजासाठी खूप काही केले. आपण समाजासाठी काय करतो आहोत हा प्रश्न आहे. समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज असून आरक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाने विचार करण्याची आवश्यकता आहे. तरुणांना दिशा देण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करावा,’’ असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. छत्रपती संभाजीमहाराज जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे रविवारी ‘राज्यस्तरीय छावा गौरव सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी छ. संभाजीराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार शशिकांत शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, अ भा छावा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, सचिन इटकर आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ग्रीनथंब पर्यावरण संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर ओरिसात आलेल्या चक्रीवादळात बहुमोल मदतकार्य करणारे जिल्हाधिकारी विजय कुलांगे (गंजाम) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पै. काका पवार (अर्जुन पुरस्कार विजेते), चित्रपट निर्मात्या अश्विनी रणजित दरेकर अभय शास्त्री (अध्यक्ष, लायन्स क्लब इंटरनॅशनल), प्रदीप लोखंडे (संस्थापक, रूरल रिलेशन्स), अनुराधा राजेंद्र नागवडे (चेअरमन, मोहटादेवी नृसिंह साखर कारखाना), गणपतराव बालवडकर (संस्थापक, शिक्षक संस्था),डॉ. सुकुमार सरदेशमुख (आयुर्वेदाचार्य, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट), सविता अतुल गांधी (योगविद्या विशारद)यांना गौरविण्यात आले. प्रतापसिंह कांचन पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. छावा संघटनेचे राजाभाऊ पवार यांनी परिश्रम घेतले.