लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनामुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. भारतही त्याला अपवाद नाही, त्यामुळे यापुढील काळात रोजगार, वेतनवाढ व सामाजिक सुरक्षा या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे, असे मत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस बिनयकुमार सिन्हा यांनी व्यक्त केले.
भामसंच्या राज्य शाखेचे २३ वे त्रेवार्षिक अधिवेशन पुण्यात आभासी पद्धतीने रविवारी झाले.
अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विजयराव मोगल होते. क्षेत्र संघटन मंत्री सी. व्ही. राजेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, "कामगारांच्या समस्यांकडे आता कोरोनानंतरच्या काळात अधिक गंभीरपणे पाहायला हवे. स्थलांतरित कामगारांचे प्रश्न नव्याने पुढे आले आहेत. त्यावर विचार व्हायला हवा." भामसं ही सगळी आव्हाने पेलून काम करेल असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला. सरचिटणीस रवींद्र देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महामारीच्या काळात एकत्रीकरण करणे अवघड असूनही नव्या तंत्राने नियम पाळून अधिवेशन घेतल्याने ते संस्मरणीय ठरणार आहे असे ते म्हणाले. सोमवारीही (दि. २१) अधिवेशन सुरू राहणार आहे. कामगार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा होऊन भामसंची धोरणे त्यात निश्चित केली जातील. आगामी ३ वर्षांच्या पदाधिकाऱ्र्यांची निवडही अधिवेशनात होणार आहे.