पुणे : सरकारमध्ये झालेला बदल हा आश्वासनांच्या पूर्तीतून दिसून येईल. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून, अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले. संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत २० लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. विचारांच्या आदानप्रदानातून देश घडविण्याची प्रक्रिया होत असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणि संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. शिवछत्रपती गौरव पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी असलेले संघटक आणि खेळाडूंचा या वेळी सन्मान करण्यात आला. ‘स्वातंत्र्यासाठी सावरकर यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले. मात्र, स्वातंत्र्यामध्ये आम्ही जनतेला न्याय दिला का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, देश महान बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कर्माची आहुती द्याायला हवी’, अशी अपेक्षा संबित पात्रा यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदू जीवनशैलीचे विश्वस्त आहेत, असे लिमये यांनी सांगितले. ‘सावरकर यांचे हिंदुत्व समजून न घेता त्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठ असा ठपका ठेवला गेला. भारताला कोणी धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही’, असे देवधर यांनी स्पष्ट केले. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी मंत्रिमंडळाच्या संपर्कात आहे. त्यामुळे राजकीय नेते फक्त आश्वासने देतात, त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. या गोष्टीला वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.
- पं. गुलाम दस्तगीर बिराजदार