नीरा (पुणे): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५३ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पाडुरंगाचा पायी पालखी सोहळा आळंदीकडे चालला आहे. पंढरपूरहून (कार्तिक शु १५) दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रस्थापन झालेल्या नामदेव महाराजांच्या व पांडुरंगाच्या पालखीचे आज पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नीरा (ता.पुरंदर) येथे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. नीरा नदीतील दत्त घाटावर दोन्ही पादुकांना स्नान घालण्यात आले.
२०१४ सालापासून पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यावर्षी पांडुरंग पालखी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १६ तर रथा मागे १० दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या यावारीत सहभागी झाले आहेत. साडेपाच हजार वारकरी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सकाळी पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटपून पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान केले. पांडुरंगाचा पालखी सोहळा शनिवारी दुपारी वाल्हे येथे मुक्काम स्थळाकडे रवाना झाले.
नामदेव महाराजांच्या पालखी सोबत महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, निवृत्ती नामदास, मुरारी नामदास तसेच पालखीसोबत पन्नास दिंड्या असून किर्तनकार राममहाराज झेजुरके, बाळू महाराज उखळीकर, बाबा महाराज आजरेकर, सोपानकाका टेंबूकर, चोपदार बापुसो ताड उपस्थित होते.
पालखी सोहळ्याकरिता पंढरपूर पासून आळंदीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट यांच्या कडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली. यानिमित्ताने नीरेतील शिंपी समाज व झांबरे परिवाराच्या वतीने विठ्ठल नामदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या विसाव्यानंतर आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.