अकोले : नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम दुर्घटना घडल्यामुळे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. लवकरच पुन्हा या कामाला सुरुवात होणार आहे.अकोले येथील पाच नंबर शाप्टवर दि. २० नोव्हेंबरला क्रेनचा वायरोप तुटून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आजपर्यंत येथील काम बंद आहे. आता या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. मात्र, या आरोपींना या आठवड्यात जामीन मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ कामगारांपैकी एका स्थानिक कामगाराचा समावेश होता. मात्र, या घटनेला एक महिना होत आला असून, या कामाला कोणत्याही संघटना अथवा वैयक्तिक विरोध होत नसल्याने या बोगद्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाने काम सुरू करण्यासाठी पूजाअर्चा करण्यात आल्याचे बोगद्याच्या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.घटना झाल्यापासून या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांची जामिनावर मुक्ततादेखील केली आहे. त्यामुळे ही लोकांच्या समाधानासाठी दाखवायची प्रक्रिया असल्याचे लोक आपापसांत बोलत आहे. त्यामुळे जीव गेलेल्या लोकांच्या नशिबी खरा न्याय कधी मिळणार आणि या घटना घडण्याला कारणीभूत असणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा कधी होणार का? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच राहणार, अशा प्रतिक्रिया स्थानिक व्यक्तकरत आहेत. मात्र, आठ कामगारांचा बळी जाऊनदेखील संबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
दुर्घटनेचा तपास अहवाल प्रलंबितचभिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सांगितले, की नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी भिगवण पोलिसांनी पुणे येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत पाहणी केली. या संदर्भातील अहवाल अजून पोलिसांना मिळाला नाही.