नीरा : सातारा - नगर महामार्गावरील नीरा ते मोरगाव दरम्यानचा रस्ता दि २३ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे बुधवार दि. २२ रोजी रात्री उशिरा सांगण्यात आले. गुळुंचे हद्दीतील रस्त्यावरील चढ काढण्याचे काम सुरू होणार असून, नीरेकडून मोरगाव कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी नीरा-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे सांगण्यात आले.
याबाबत बारामती बांधकाम विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, नीरा-मुर्टी-मोरगाव सुपे रस्ता प्रजिमा ६७ किमी ५/८५० ते ९/८५० व २१/६५० ते २४/०० मध्ये सुधारणा करणे, या कामांतर्गत किमी ६/६६० से ७/०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीमधील कठीण चढाचे खोदकाम करणेचे काम या उपविभागाचे देखरेखीखाली इंडिकॉन कन्स्ट्रक्शन, सातारा रोड पुणे यांचेमार्फत प्रगतीत आहे. या रस्त्याचे किमी ६/६६० ते ७०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीतील खोदकाम करण्यासाठी दि. २३/३/२०२३ ते २७/३/२०२३ या कालावधीमध्ये रस्ता बंद करणे आवश्यक आहे. यास्तव वरील कालावधीमध्ये रस्ते वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रस्त्यावरील अवजड वाहने व इतर वाहतूक निरा वाल्हे जेजूरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात यावीत असे बुधवारी रात्री उशिरा सांगितले गेले.
वास्तविक असा मोठ्य रहदारीचा रस्ता काही कामानिमित्त बंद करायचा असल्यास आठवडाभरापुर्वी परिसरातील गावांच्या ग्रामपंचायतींना व वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलिसांना कल्पना देणे गरजेचे असते. मात्र बारामती बांधकाम विभागाने अशी कोणतीच कल्पना या रस्त्यावरील गावांना न देता गुरवारी सकाळी अचानक रस्ता वाहतूकीसाठी बंद केला. त्यामुळे स्थानिकांसह लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.