निरवांगी : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रातील निमसाखरपासून नीरा नरसिंहपूरपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्यावाचून कोरडे पडले आहे. इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके धोक्यात आली आहे. याच बरोबर नदीच्या पात्रालगत असलेल्या गावातील विहिरी व विंधनविहिरीचे पाणीही कमी होत आहे.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा नदी ही वरदान आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साधारण जानेवारी महिन्यातच नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडत आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरनिमगाव, नीरानरसिंहपूर तर माळशिरस तालुक्यातील मोरेवस्ती, बागर्डे, पळसमंडळ, कदमवाडी, अकलूज अशी गावे आहेत. या गावांतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी हे नीरा नदीच्या पात्रातील वापरतात. गेल्या काही वर्षांपासून नदीचे पात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासूनच कोरडे पडत आहे. यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फटका बसत आहेत. निरवांगी, सराटी परिसरातील गावात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी आंदोलने झाली; परंतु पाणी मात्र आलेच नाही. यामधील काही गावांतील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. यामुळे उन्हाळी पाणी आवर्तनापासून शेतकरी वंचित राहतात. डिसेंबर ते साधरण जुलैपर्यंत नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने नदी किनारी असलेल्या गावांतील विहिरी व बोअरवेल ही पाणी कमी पडत आहे. नीरा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी गेल्या वर्षी निरवांगी या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता; परंतु पाणी सोडण्यात आलेच नाही.