रेडणी - बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील महिन्यात नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडावे, म्हणून आंदोलन सुरू केले होते. ते आठवडाभर चालले. यावर्षी धो धो पाऊस पडूनही नदीकाठी पाणीटंचाई जाणवू लागली. याचे कारण म्हणजे नदीपात्रात झालेला बेसुमार वाळूउपसा. पूर्वी नीरा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू होती. परंतु, वाळू उपशामुळे नदीत वाळू शिल्लक नाही. वाळूच्या खालून जो पाण्याचा प्रवाह असतो, तो नदीकाठच्या स्रोतांना पाणी पुरवत असतो. भूजल साठ्याचे पुनर्भरण करत असतो. पूर्वी नदीतील पाणी आटले तरी वाळूतील पाण्यामुळे बरेच दिवस पाणीटंचाई जाणवत नव्हती. शेतीला पाणी पुरत होते. नदीपात्रातील वाळू पूर्णपणे उचलल्यामुळे खडक उघडे पडले आहेत. परिणामी नदी कोरडी पडली, की दोन दिवसांत पाणीटंचाई जाणवते. पूर्वी वाळूतील पाण्यामुळे नदीतील पाणी संपल्यानंतर माहिनाभरसुद्धा पाणी मिळत होते. नदीकाठच्या विहिरींना पाणी येत होते. असे भूजलतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.नदीकाठच्या शेतकºयांना जलसाक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच शासनाने वाळूउपशावरील बंदी अमलात आणली पाहिजे. वाळू उपशाविरोधातील मोहीम शासनाने आता तीव्र करण्याची गरज आहे. नदीपात्रात पाणी असताना प्रचंड प्रमाणात होणाºया पाणी उपशावरही काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नीरा नदीची पातळी घटली, वाळूउपशाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 2:45 AM