भारतातलं चित्र पूर्ण वेगळं आहे. खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणाईपुढं आशावाद आहे. महत्त्वाकांक्षा आहेत. केवळ क्रीडाच नव्हे तर विज्ञान, आयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शेती, अवकाश, कला या विविध क्षेत्रातल्या हजारो प्रेरणादायी ‘सक्सेस स्टोरीज’ भारतीय तरुणाईपुढं आहेत. म्हणून तर ईशान्येकडच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून मीराबाई चानू येते आणि ऑलिम्पिक विजेती होऊन जाते. उत्तर प्रदेशातल्या मुली जगातली मैदानं गाजवतात. हरियाणातले पहिलवान युरोपच्या पहिलवानांना घाम फोडतात. या सगळ्यांना पाहात त्याच्यापुढं जाण्याची ईर्षा बाळगणारी नवी पिढी घडण्याची प्रक्रिया भारतात अखंड चालू आहे. ती क्रिकेटमध्ये आहे, कुस्तीत आहे, बॅॅडमिंटनमध्ये आहे किंवा हॉकीसारख्या अन्य क्रीडा प्रकारात.
असं असूनही भारतातला ठरावीक वर्ग पाकिस्तानशी स्पर्धा करण्यात, तुलना करण्यात आघाडीवर असतो. हा बालीशपणा नसतो. स्थानिक राजकारणातली गणितं जपण्यासाठी धार्मिक उन्माद पेटवत राहणं ही या गटाची राजकीय गरज आहे. पाकिस्तान्यांशी संवाद ठेवल्यानं, मैत्री राखल्यानं कोणी देशद्रोही ठरत नाही. नीरज चोप्राचा भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं वापरला म्हणून नीरजचं सुवर्णपदकावरचं लक्ष्य विचलित झालेलं नव्हतं. पण फुटकळ निमित्तानं धार्मिक विद्वेष माजवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. हा विखारी वर्ग एका बाजूला तसाच कला-क्रीडेच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान भाऊ-भाऊ होतील, असा आशावाद बाळगणारा भोंगळ वर्ग दुसऱ्या बाजूला. एखादा मुशायरा, शेरोशायरीची मैफल, लिट-फेस्ट, क्रिकेट किंवा हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना खेळवल्यानं भारत-पाकिस्तान एकत्र येतील, अशी अपेक्षा ठेवणारा. यात गैर काही नाही; पण याला वास्तवाचं बूड हवं. वास्तव काय तर राजकीय, तात्त्विक आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे धार्मिक मतभेद तीव्र असताना गाण्या-बजावण्यातून, खेळण्यातून वैर संपल्याचं उदाहरण जगाच्या पाठीवर मिळणं मुश्कील आहे. याचा अर्थ असा नव्हे की कला, क्रीडेच्या क्षेत्रातही शत्रुत्व, खुन्नस बाळगली पाहिजे. जगात अव्वल व्हायचं तर एकाग्रता खेळावरच करावी लागते. सचिन तेंडुलकर मैदानाबाहेर कधीच वायफळ बोलताना दिसला नाही. म्हणूनच तो वॉंडरर्सच्या मैदानात शोएब अख्तरचा ताशी १४०-१४५ किलोमीटर वेगाचा चेंडू पॉइंटवरून शांतपणे प्रेक्षकांमध्ये भिरकावून देऊ शकला. खेळाडूंकडून चार गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण ज्या क्षेत्रात असू तिथं प्रामाणिकपणानं, मेहनीतनं सर्वोच्च दर्जा राखणं महत्त्वाचं. वैर जपण्यापेक्षा मैदान मारत राहा. मग ते कोणतंही असो. बाकी बाष्कळ बडबडवीरांना अनुल्लेखानं मारणं श्रेयस्कर. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचं सांगणं इतकंच आहे.