पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा (नीट- युजी २०२३ ) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. तमिळनाडूच्या प्रभंजन जे याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आंध्रप्रदेशचा बाेरा वरूण चक्रवर्ती दुसरा तर तामिळनाडूचा काैस्तव बाउरी याने तिसरा आला आहे. महाराष्ट्राच्या श्रीकेथ रवी याने देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकाविला.
देशातील टाॅप ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये श्रीकेथ रवी ७ यांच्यासह तनिष्क देवेंद्र भगत २७ आणि रिध्दी वाजारिंगकर ४४ व्या स्थानावर आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गात पलक निशांत शहा ४ थ्या तर एससी कॅटेगरीमध्ये आयुष राजकुमार रामटेके याने देशात तिसऱ्या स्थान मिळविले.
भारतातील ४९९ आणि परदेशातील १४ शहरांतील ४ हजार ९७ केंद्रांवर ७ मे राेजी नीट युजी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यंदा २० लाख ८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती त्यापैकी २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र झाले असून महाराष्ट्रातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना https://www.nta.ac.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
दिव्यांगांचे यश
पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी (पीडब्ल्यूबीडी) प्रवर्गात मुलींमध्ये पहिल्या दहात महाराष्ट्रातील तिघींचा समावेश आहे. त्यात आर्या चारूदत्त पाटील हिने चौथा, श्रेया विलास राठाेड ५वा आणि किरण दिनेश शेलाेकर हिने ८वा क्रमांक मिळविला आहे. मुलांमध्ये आशिष मिलिंद भराडिया पहिला, तर हादी मोहतसीम सोलकर नवव्या स्थानावर आहे.
परीक्षार्थी पात्र विद्यार्थीमुले : ८ लाख ८१ हजार ९६७ ४ लाख ९० हजार ३७४
मुली :११ लाख ५६ हजार ६१८ ६ लाख ५५ हजार ५९९तृतीयपंथी : ११ ०३