बारामती : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे काम पूर्णत्वाला गेले. या स्टेडियमचा लोकार्पण सोहळा येत्या ६ एप्रिल रोजी होणार आहे. क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. यानिमित्त प्रदर्शनीय क्रिकेट सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संघ यांच्यामध्ये खेळला जाईल. लोकार्पण सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता या दोन संघांमध्ये सामना होईल. सामन्यासाठी विशेष आकर्षण म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहे. शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजय शिर्के तसेच आजी-माजी क्रिकेटपटू या वेळी उपस्थित राहणार आहेत. या टी-२० सामन्याची जोरदार तयारी सुरू आहे. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्टेडियमचा लोकार्पण सोहळा होणार आहे. डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात स्टेडियमचे काम सुरू झाले होते. ते पूर्णत्वाला नेऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी खुद्द शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला. अवघ्या तीन महिन्यांत स्टेडियमच्या लॉनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली काम सुरू करण्यात आले. (प्रतिनिधी)लॉन अफ्रिकेतून...दक्षिण अफ्रिकेतून लॉन आणण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर जवळपास ६ कोटी रुपये खर्चांची कामे केली जातील, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.‘लोकमत’चा पाठपुरावाशहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम २५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत होते. या स्टेडियमचे काम पूर्णत्वाला जाण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घातले. त्यामुळे स्टेडियमच्या कामाला गती आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत सामना होणार आहे. या ठिकाणी क्रिकेटपे्रमींसाठी ८ पिच सरावासाठी बनविली आहेत. दोन पिच मुख्य स्टेडियममध्ये सामन्यासाठी बनविली आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होणार आहेत. त्या दृष्टीने २२ हजार प्रेक्षकांसाठी खुर्च्या बसविण्यात येणार आहेत. उर्वरित गॅलरी, पॅव्हेलियनसह अन्य कामे नगरपालिकेच्या माध्यमातून केली जातील. त्यामध्ये व्हीआयपी कक्ष, व्यायामशाळा, स्टेडियमच्या सर्व गॅलरींना आच्छादन आदींची व्यवस्था आहे. - नदीम मेमन
बारामतीतील आंबेडकर स्टेडियमची उपेक्षा संपली
By admin | Published: April 02, 2016 3:24 AM