कुरकुंभ : कुरकुंभ येथून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला मोठ्या काटेरी झुडपांचे साम्राज्य ठिकठिकाणी निर्माण झाले असून, महामार्गाच्या लगत असणाऱ्या सेवा रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात धूळमाती, काटेरी झुडपे उगवली आहेत, तसेच घासाचे प्रमाण देखील मोठ्या स्वरुपात असल्याने बेवारस जनावरे थेट महामार्गावर चरायला येत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर प्रवाशांची व वाहनांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
महामार्गाच्या नूतनीकरणानंतर डागडुजी, साफसफाई तसेच इतर सुरक्षेच्या यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. महामार्गावर दुभाजकामध्ये झाडांचा अभाव, तर काटेरी झुडपांचा प्रभाव अधिक दिसून येतो आहे. रस्तादुभाजक व महामार्गाच्या कडेला असणाऱ्या सुशोभीकरणाच्या जागेत घासाचे प्रमाणच जास्त झाल्याने बेवारस जनावरे चरण्यासाठी थेट महामार्गावर जात असून, मुख्य रस्त्यांवर निवांत पहुडलेली दिसून येतात. परिणामी, महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत अनेकवेळा देखभाल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेला कळवण्यात आले असून, मुख्य चौकातील तात्पुरत्या साफसफाई व्यतिरिक्त काहीच उपाय केले जात नाही. विशेष बाब म्हणजे, महामार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एक अत्यावश्यक सेवेतील वाहन व काही सुरक्षारक्षक पेट्रोलिंग करीत सतत ये-जा करीत असतात. मात्र ते देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे महामार्गावर रात्री-अपरात्री तर सोडाच दिवसा प्रवास करणे जिकिरीचे व प्राणघातक झाले आहे.
.
टोलवसुली शंभर टक्के
_पुणे-सोलापूर महामार्गावर नूतनीकरण झाल्यावर पाटस येथे टोलनाका उभारण्यात आला. यामध्ये स्थानिक वाहनासह प्रत्येक वाहनाकडून सक्तीने टोल वसूली करण्यात येते. वेळप्रसंगी खासगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून दमदाटी करणे वाहनांना अडवून ठेवण्याचे प्रकार होत आले आहेत