पुणे : मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ मिळावा, अशी मागणी चित्रपटसृष्टीतील मंडळी करीत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासाठी मल्टिप्लेक्सला इशाराही दिला आहे. मात्र, पुण्यातील मराठी चित्रपटांची पंढरी समजली जाणाऱ्या किबे थिएटरमध्ये (पूर्वीचे प्रभात) डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचा एकच शो आहे. उलट ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाचे तीन शो लावण्यात आले आहेत.
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्थान मिळत नाही. शासनाचे बंधन व काही पक्ष- संघटनांचा धाक यामुळे किमान काही मराठी चित्रपट लावले जातात. मराठीतील बड्या बॅनरच्या चित्रपटांनाही याचा फटका बसतो. पहिल्याच आठवड्यात खूप जास्त शो असल्यामुळे हिंदीतील एखादा टुकार चित्रपटही चांगला व्यवसाय करून जातो. परंतु, चांगल्या मराठी चित्रपटाला हे शक्य होत नाही. यंदाच्या दिवाळीत ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ सारख्या बड्या चित्रपटाशी स्पर्धा होती. ‘किबे थिएटर’सारखे हक्काचे थिएटरही आता हिंदीच्या प्रेमात पडले आहे. किबे थिएटरमध्ये या चित्रपटाचा सायंकाळी केवळ एकच शो लावण्यात आला आहे, तर ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाचे तीन खेळ सुरू आहेत. या थिएटरने मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. मराठी चित्रपटांच्या देदीप्यमान यशामध्ये या चित्रपटगृहाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.शासन स्तरावर कोणत्याच हालचाली होत नाहीहिंदी चित्रपट वितरकांच्या मोनोपलीमुळे मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे; मात्र हे अवगत असूनही शासन स्तरावर कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे त्याचा फटका चांगल्या मराठी चित्रपटांना बसत आहे.दोनच दिवसांपूर्वी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाबरोबरच ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकला आहे. ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’च्या वितरकांनी काही थिएटरचालकांवर हा चित्रपट लावण्यासाठी आग्रह धरला असल्याचे कळते, त्यामध्ये किबे थिएटरचाही समावेश आहे. त्यामुळेच ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’चे तीन खेळ लावण्यात आल्याचे किबे थिएटरचे मालक अजय किबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.किबे थिएटरमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाचा एकच शो लावल्यामुळे प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’च्या वितरकांनी आमच्याकडे आग्रह धरल्यामुळे आम्हाला तीन खेळ लावावे लागले. पुढच्या आठवड्यात ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाचे चार खेळ लावण्याचा विचार सुरू आहे. - अजय किबे, मालक किबे थिएटर