दीपक कुलकर्णी पुणे : देवाच्या नावाने जंगलाचा तुकडा राखून ठेवण्यामागे पर्यावरण रक्षणाचीच भूमिका होती. त्यातूनच देशात देवराया बहरल्या होत्या. परंतु, सध्या देवरायांकडे होणारे दुर्लक्ष पर्यावरणदृष्टया घातक असल्याचे मत देवराईच्या अभ्यासक डॉ. माणिक फाटक यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारतात आजच्या स्थितीला देवरायांचे गाढे अभ्यासक डॉ. के. पी. मल्होत्रा यांच्या मते जवळपास अंदाजे दीड लाख देवराई अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात दहा हजार आणि पुणे जिल्ह्यात एकूण तीनशे ते साडेतीनशे देवराई आहे. सावंतवाडी ते रत्नागिरी या परिसरात एकूण साडेआठशे तर वेल्हा आणि तोरणा गडाच्या पायथ्याशी तीस ते चाळीस देवराई उपलब्ध आहेत. डॉ. फाटक म्हणाल्या, देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. गेली कित्येक वर्ष या देवराया फक्त वनस्पती शास्त्रापुरताच मर्यादित होत्या. परंतु, १९७० च्या दशकात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक व डॉ. माधव गाडगीळ यांनी देवराईंबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास सुरु केला. त्यासाठी त्यांनी १९८९ साली महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या माध्यमातून देवराईविषयीचे एक एक रहस्य समोर येऊ लागले. या देवरायांना प्रादेशिक प्रांत अथवा तिथल्या रहिवासी लोकांनी विविध नावे बहाल केली आहेत. उदा. कोकणात देवराहाटी, महाराष्टात देवराई, कर्नाटकात देवबन, राजस्थानमध्ये देवमाया यांसारख्या नावांचा त्यामध्ये समावेश आहे. या देवराईचे क्षेत्र एकाझाडापासून ते काही हेक्टर पर्यंत असू शकते. दापोली ते कुडाळ या परिसरातील एक देवराई तर १०० एकरपर्यंत पसरलेली आहे.