पुणे : राष्ट्रवादीबरोबर जवळीक वाढवीत पदे पदरात पाडून घेत स्वीकृत सदस्य निवडीतही राजकारण करण्याच्या मनसेच्या स्थानिक नेत्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सामाजिक कार्यकर्त्यांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याच्या प्रयत्नाबाबतही कानउघाडणी केली. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसपुढे मात्र अडचण निर्माण झाली आहे. स्थायी समिती व प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीला साथ दिली होती. यंदाही मनसेच्या भरवशावरच राष्ट्रवादीने रणनीती आखली होती. मात्र, मनसे तटस्थ आणि काँग्रेसनेही हात वर केल्याने ऐन वेळी ‘एकला चलो रे’ अशी परिस्थिती राष्ट्रवादी कॉँग्रेसवर ओढविली आहे. काँग्रेस आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपा व शिवसेना युतीला होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी तीन सदस्यांची निवड बुधवारी ११ वाजता होणार आहे. एका नगरसेवकाला कमाल तीन मते देण्याचा अधिकार आहे. प्रभाग समिती अध्यक्ष व सहायक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीने स्वीकृत सदस्य निवडीत मनसेचा पाठिंबा गृहीत धरला होता. मात्र, मनसेतील प्रमुख नगरसेवकांनीच स्वीकृत सदस्य निवडीत रस दाखविला नाही. शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेते बाबू वागस्कर, अॅड. किशोर शिंदे, वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांनी सामाजिकऐवजी राजकीय कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी विरोध दर्शविला. मनसेने स्वत: सामाजिक कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी उभे करायचे होते, असेही सुनावले. स्थायी समिती अध्यक्ष व पीएमपी संचालक निवडीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली होती. त्यामुळे काँग्रेसला प्रभाग समिती अध्यक्ष निवडीत १५ पैकी केवळ एकच पद मिळाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बिघाडी, मनसेच्या तटस्थ भूमिकेचा फायदा भाजपा व शिवसेना युतीला होण्याची शक्यता आहे. ऐन वेळी राजकीय समीकरण बदलल्यामुळे कोणत्या पक्षातील किती सदस्यांना संधी मिळते याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
‘राजडोसा’मुळे मनसे स्वीकृत सदस्य निवडणुकीत तटस्थ
By admin | Published: May 13, 2015 3:04 AM