पुणे : शहरात मध्यभागात अतिशय जैवविविधतेने नटलेले हरित पट्टा म्हणजे डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्यात सुमारे ११० विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात. पण अद्यापही या अभयारण्याला सरकार दरबारी मान्यता मिळालेली नाही. डॉ. सालिम अली यांनी १९७० मध्ये या भागात भेट देऊन येथील जैवविविधतेचे कौतूक केले होते. त्यांची आज १२३ वी जयंती असून, या अभयारण्याला महापालिका आणि सरकारने अधिकृत दर्जा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अभयारण्यात खूप जैवविविधता आहे. येथील परिसंस्था सरकारकडूनच नष्ट केली जात आहे. खराडी ते शिवणे हा रस्ता या अभयारण्याला लागून जात आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी वृक्षतोड होत आहे. यासाठी सुनावणी घ्यायला हवी ती घेतली नाही. दुसरे म्हणजे मेट्रो मार्गाचा जो भाग प्रस्तावित आहे, तो याच ठिकाणाहून जात आहे. त्यामुळे त्याचाही अभयारण्याला फटका बसणार आहे. एका रात्रीत ५९१ वृक्ष येथे तोडलेले आहेत. परंतु, त्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी माहिती पक्षी संशोधक आणि डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याचे धर्मराज पाटील यांनी दिली. बंडगार्डन पलिकडच्या नदी किनारी १९६०-७० या काळात पक्ष्यांची मोठी गजबज होती. त्यामुळे त्या ठिकाणी पक्षी अभयारण्य असले पाहिजे, असा विचार समोर आला होता. म्हणून पक्षी प्रेमींनी डॉ. सालिम अली यांना हे ठिकाण दाखविले. डॉ. सालिम अली यांनी देखील येथील पक्षी पाहून कौतूक केले होते. डॉ. सालिम अली यांच्या इच्छेनुसार इकॉलॉजिकल सोसायटीचे संस्थापक डॉ. प्रकाश गोळे आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. एरिक बरूचा यांनी अभयारण्याचा प्रस्ताव मांडला होता. १९७४ मध्ये डॉ. सालिम अली यांच्या हस्ते अभयारण्याचे उद्घाटन झाले. परंतु, त्यानंतर पुणे महापालिका आणि सरकारने देखील याकडे दुर्लक्ष केले. उलट आज येथील झाडे तोडण्यावरच सरकारचा भर दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर नदीतून प्लास्टिक आले आहे. ते काढल्याशिवाय येथील पक्ष्यांना अन्न मिळणे अवघड आहे. नदी पात्रालगत स्वच्छता मोहिम राबविणे आवश्यक आहे. डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांसाठी अधिवास आहे. परंतु, वृक्षतोड, कचºयाचे साम्राज्य यामुळे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार वंदना चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेऊन येथे सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरही काहीच उपाय झाले नाहीत. - धर्मराज पाटील, वन्यजीव संशोधक
घनदाट झाडी जाऊन झाले मोकळे आकाश...डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याच्या जलाशयात, दलदलीत आणि झाडांमध्ये राहणारे असे तीन प्रकारचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्याला लागून असलेल्या नदीत मैलापाणी मिसळल्याने पाण्यातील आॅक्सिजन नष्ट झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळणे अवघड झाले आहे. येथील मोठी घनदाट झाडीही कमी झाली आहे. डॉ. सालिम अली यांनी भेट दिली तेव्हा येथे जमिनीवर बसल्यानंतर आकाश दिसत नव्हते, एवढी झाडी होती. पण गेल्या काही वर्षांपासून अभयारण्यतील वृक्षतोड होत आहे. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली. तरी सरकार दरबारी अनास्थाच आहे.