लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्राबाबत ग्रामीण भागात गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीने अनेकदा प्रस्ताव सादर केले. मात्र, अद्यापही याबाबत कारवाई प्रशासनाने केलेली नाही. याबाबत प्रांताधिकारी यांना अधिकार असतानाही त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. अनेक गावांत तलाठी उपलब्ध नसतात. ग्रामीण रुग्णालयांकडेही आराेग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य उपसंचालकांनी या काळात या ठिकाणी भेट देणे गरजेचे असतानाही याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच सदस्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापतिपती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, पूजा पारगे, सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके आदी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व सदस्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. महसूल प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य उपसंचालक यांच्याकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आणि उपसंचालक डॉ. संज्योत कदम यांना आपण किती ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली, असा थेट सवाल करण्यात आला. यावर डॉ. नांदापूरकर यांना उत्तर देता आले नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोराेना नियंत्रणात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात कोरोना उपाययोजना बाबत प्रशासन हलगर्जीपणा करत आहे. यामुळेच ग्रामपंचायतींनी मागणी करूनही नव्याने प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. जिल्हास्तरावर परिपत्रक आणि आदेश मात्र चांगले निघत असले तरी प्रत्यक्षात गावांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याने रुग्णसंख्या कमी होत नाही. तालुक्याचे नियंत्रण प्रांत अधिकारी यांच्या कक्षेत आहे. परंतु त्यांची संपूर्ण यंत्रणाच ढिल्ली पडल्याने ग्रामीण क्षेत्रात कोरोना नियंत्रित होणे अवघड होत असल्याचे शरद बुट्टे पाटील, वीरधवल जगदाळे, अंकुश आमले, आशा बुचके यांच्यासह अन्य सदस्यांनी सांगितले.
अध्यक्ष निर्मला पानसरे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनीदेखील यांनी देखील प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालय यांना व्हेंटिलेटर देण्यात आले. परंतु ते बसवले गेले नाहीत. अनेक गावे हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना केल्या, असा सवाल त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना केला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट क्षेत्र असणाऱ्या गावांमध्ये अधिकारी उद्यापासून दौरे करतील, बैठका घेतील असे सांगितले.
---
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली दिलगिरी व्यक्त
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वारंवार बैठकीमधून दोन वेळा बाहेर गेले. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना यापेक्षा दुसरे अधिक महत्त्वाचे काय आहे, अशी विचारणा उपस्थित सदस्यांनी अध्यक्ष निर्मला पानसरे यांना केली. ते पुन्हा सभागृहात आल्यानंतर अध्यक्षांनी नाराजीबद्दल सांगितले, तेव्हा आयुष प्रसाद यांनी सभेत दिलगिरी व्यक्त केली.