पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चपलेने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रक्षकनगर मध्ये बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहण्यास आहे. त्यांच्याकडे तीन तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आयटी इंजिनिअर असलेल्या या मुली खराडी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान या तरुणी अधून-मधून शॉर्ट्स घालून घराबाहेर पडत असतात. या तरुणांनी शॉट घालने शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांना खटकत असे. यावरून त्यांनी फिर्यादी महिलेलादेखील विचारणा केली होती. परंतु त्यांनी काय घालावे काय घालू नये हा त्यांचा प्रश्न असल्याचे फिर्यादीने त्यांना सांगितले होते.
दरम्यान याच कारणावरून शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना वाईट वाईट शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण देखील केली. तसेच शॉर्ट घालून घराबाहेर फिरणार्या आयटी इंजिनियर मुलींना देखील चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत.