नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतीची कर थकबाकी असल्याच्या कारणावरून अवैध ठरले. यामध्ये ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आशा सूर्यवंशी आणि विद्यमान सदस्य रफिक शेख यांच्या पत्नी सायरा शेख यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने सत्ताधारी विकास आघाडीला निवडणुकीच्या सुरुवातीला जबरदस्त धक्का बसला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत कराची थकबाकी असल्याच्या कारणावरून वार्ड क्र. १ मधून इतर मागासवर्गीय महिला या जागेसाठी सायरा रफिक शेख आणि वॉर्ड क्र. ४ मधून अनुसूचित जाती महिला या जागेसाठी आशा पंढरीनाथ सूर्यवंशी या दोघा महिला उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उर्वरित ८५ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी सस्ते आणि सहायक अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली.नीरा ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी विकास आघाडीच्या वतीने आशा सूर्यवंशी आणि सायरा शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या संदर्भात विकास आघाडीचे विद्यमान प्रभारी सरपंच राजेश काकडे म्हणाले, की निवडणुकीतील तांत्रिक चुकांमुळे विकास आघाडीच्या आशा सूर्यवंशी आणि सायरा शेख या दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असले, तरी हा विकास आघाडीला धक्का नाही. निवडणूक प्रक्रियेत तांत्रिकदृष्ट्या चढउतार होत असतात, असे सांगून निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षात मात्र विकास आघाडीला निश्चित सर्व जागांवर यश मिळणार, याची खात्री आहे. दरम्यान, नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये विरोधी चव्हाण गटाच्या वतीने कोणाही उमेदवाराविषयी कोणत्याही स्वरूपाचा लेखी आक्षेप घेण्यात आला नव्हता, असे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी सस्ते यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)
नीरेत २ महिला उमेदवार रिंगणाबाहेर
By admin | Published: July 22, 2015 3:15 AM