पुणे: केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांना देशातील हिंदुची किंवा मुस्लिमांचीही चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्ता कशी राहील याचीच चिंता आहे अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. सत्तेसाठी ते संविधानही बदलतील असे सांगत ते सोयीने सगळे नियम बदलत चालले आहेत असे सावंत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालगंधर्व कलादालनातील व्यंगचित्र प्रदर्शनाला सावंत यांनी गुरूवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार सगळे नियम बदलत चालले आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश करतील असा नियम होता. त्यांनी सरन्यायाधिशांना काढून टाकले. तिथे पंतप्रधान सुचवतील ते मंत्री असा बदल केला. आता आयुक्तांची निवड कायमच दोन विरूद्ध एक अशा मतांनी होईल.
वक्फ बोर्डाचा तब्बल ६९५ पानांचा अहवाल त्यांनी सायंकाळी सव्वासहा वाजता पाठवला. त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बोर्डाची बैठक आहे, त्यात तुमचे म्हणणे मांडा असे कळवण्यात आले. ६०५ पानांचा अहवाल वाचणार कधी व त्यावर म्हणणे तयार करणार कधी? पण याचा विचार ते करत नाहीत. सगळे आधीच ठरलेले असते, त्याप्रमाणेच त्यांना करायचे असते. बोर्डमध्ये बहुमताने ज्या सुधारणा झाल्या, त्या अशा करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे असे सावंत म्हणाले.
देशात हिंदु विरूद्ध मुस्लिम कसे होईल हेच ते पहात असतात असा आरोप सावंत यांनी केला. देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, मात्र त्यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असे ते करतात. याचा अर्थ त्यांना हिंदुंची किंवा मुस्लिमांची काळजी आहे असा नाही तर सत्ता कशी टिकवता येईल याची चिंता आहे. त्यांचे जे काही सुरू असते ते सगळे सत्ता कशी मिळेल यासाठीच अशी टीका सावंत यांनी केला.