आळेफाटा : ऊसाच्या शेतात सापडलेली तीन पिल्ले वनविभागाने सुरिक्षत ठेवली होती. त्यामुळे आईच्या मायेने येऊन बिबट्याची मादी ही पिल्ले घेऊन गेली. वडगाव कांदळी येथे हा प्रकार घडला.
जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील मुटके मळ्यातील निवृत्ती मुटके यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू होते. संध्याकाळी साडेपाच वाजता मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली. याबाबत शेतकरी मुटके यांनी ताबडतोब वनविभागाशी संपर्क साधला. जुन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह निवारा केंद्रातील कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर सहाय्यक पशुवैद्यक महेंद्र ढोरे, ओतूरचे वन कर्मचारी कैलास भालेराव व सचिन मोडवे या सर्वांनी याठिकाणी येऊन पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांनी सांगितले की दोन महिन्याच्या तीन पिल्लांपैकी दोन नर असून एक मादी आहे. ज्या ठिकाणी पिल्ले सापडली होती तेथेच त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले होते. सात वाजता बिबट मादीने आपल्या पिल्लांना बरोबर घेऊन नैसर्गिक अधिवासात प्रस्थान केले. फोटो- वाडगाव कांदळी (पिंपळवंडी) येथे बिबट्याची पिल्ले काही वेळातच विसावली आईच्या कुशीत