पुणे : पुण्यात गेली अनेक वर्षे चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग) मार्गावर निओ मेट्रो मार्गस्थ करण्यासाठीच्या प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) मंगळवारी महामेट्रोकडून महापालिकेला सादरीकरण करण्यात आले. शहरात वर्तुळाकार अशा ४३.८४ कि.मी. लांबीची व तीस मीटर उंचीवरून ही निओ मेट्रो धावणार असून, याकरिता सुमारे ४ हजार ९४० कोटी रुपये खर्च येणार आहे.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ व हेमंत सोनवणे यांनी या डीपीआरचे सादरीकरण केले. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला उपस्थित होते. निओ मेट्रोचे हे प्राथमिक सादरीकरण असून, पुढील आठवड्यात प्रस्तावित डीपीआरसह निओ मेट्रो मार्गावर भेट देण्यात येणार आहे.
इलोव्हेटेड निओ मेट्रो बोपोडी येथून सुरू होणार असून, मेट्रो मार्गावर लोहगाव विमानतळासह आंबेडकर चौक स्टेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, केळेवाडी, पौडफाटा, अलंकार पोलीस ठाणे, सिद्धी गार्डन, सणस क्रीडांगण, लक्ष्मी नारायण चौक, सिटी प्राइड स्टेशन, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, बिबवेवाडी, लुल्लानगर, डेक्कन महाविद्यालयासह शहराच्या मध्यवर्ती भागातील व वर्दळीच्या ठिकाणच्या ४५ स्थानकांचा समावेश केला आहे.
निओ मेट्रो प्रकल्पासाठी एक किलोमीटरसाठी ११२ कोटी रुपये खर्च येणार आहे. हाच खर्च एचटीएमआरसाठी प्रती किलोमीटर २५० कोटी रुपये इतका अपेक्षित धरला होता. निओ मेट्रो प्रकल्प २०२३ डिसेंबरमध्ये सुरू झाल्यास २०२८-२९ मध्ये पूर्णत्वास जाऊ शकतो, असेही महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खडकवासला ते खराडीपर्यंत मेट्रोचा विस्तार
- मेट्राे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुमारे २८ कि.मी. मार्गाचा आराखडाही महामेट्राेने महापालिकेला सादर केला. यासंदर्भात महापालिका प्रशासन अभ्यास करून महामेट्रोला आपल्या सूचना सादर करणार आहे.
- हा मार्ग खडकवासला ते खराडी राहणार असून, या मार्गावर २५ हून अधिक स्थानके असतील. या मार्गासाठी सुमारे ८ हजार ५८५ काेटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी स्वारगेट, सिंहगड रस्ता, साेलापूर रस्ता येथील उड्डाणपूल पाडले जाणार नाही, असा दावा महामेट्राेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
- उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्यालगतची जागा ताब्यात घेऊन येथे मेट्रो मार्ग साकारण्यात येणार आहे. हा मार्ग वर्तुळाकार स्वरूपात जोडण्यात येणार असून, त्यासाठी सिंहगड रस्त्यावर महामार्गाच्या बाजूला दौलतनगर हे स्टेशन राहणार आहे. या ठिकाणाहून वारजे, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि पौड फाटा ही स्थानके जोडण्यात येणार आहेत.