जेजुरी : पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शाळांचे तालुकास्तरावरून होणारे मूल्यांकन निव्वळ फार्स असल्याची चर्चा पुरंदर पंचायत समिती व पदाधिकाऱ्यांतून होत आहे. मूल्यांकनासाठी अवघ्या तीन दिवसांत समिती स्थापन करून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांनीच मूल्यांकन उरकले असून, शासकीय गुणवत्ता कार्यक्रमाचा पार फज्जा उडवण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे मूल्यांकन करण्यासाठी शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता आणि शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी सुमारे १७५ प्रश्नांची प्रश्नावली व त्यावर २०० गुण देण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर व जिल्हास्तरावरून समित्या नेमण्याच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरील कमिटीमध्ये समितीचा निमंत्रक म्हणून गटविकास अधिकारी, सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी यांशिवाय शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती सदस्य, केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेला स्वयंसेवी संस्थेचा एक प्रतिनिधी व एक तज्ज्ञ व्यक्ती अशी ७ जणांची ही समिती असते. त्या समित्या नेमल्यानंतर त्यांना मूल्यांकनाबाबतचे प्रशिक्षण देण्याच्याही सूचना आहेत. मूल्यांकनातून तालुकास्तरावरून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे वर्गीकरण करून त्या शाळांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार, अशी पारितोषिके २६ जानेवारीस प्रजासत्ताक दिनी देण्याचा ७ जानेवारी २०१३ रोजीचा शासननिर्णय आहे. महत्त्वाचे म्हणजे हे मूल्यांकन १ ते २० जानेवारी याच कालावधीत करण्याच्याही स्पष्ट सूचना आहेत. पुरंदर तालुक्यातील शिक्षण विभागाने मात्र या सर्व सूचना व निर्देशांना हरताळ फासून परवाचा शनिवार आणि आजचा सोमवार या दोनच दिवसांत मूल्यांकन उरकले आहे. केंद्रशाळांतर्गत येणाऱ्या शाळांची या समितीऐवजी केंद्रप्रमुखांकडून स्वयंमूल्यांकनाच्या नावाखाली ६ शाळांची यादी तयार करून घेतली. त्यातून राजेवाडी, मांडकी, आस्करवाडी, पानवडी, वाळुंज, पारगाव या शाळा मूल्यांकनासाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यांचे मूल्यांकन पुरंदरच्या शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत उरकले.यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तर झालेले मूल्यांकन हे सर्व पंचायत समिती सदस्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून पारदर्शकपणे केले असल्याचे सांगितले. तर, गटविकास अधिकारी एल. आर. वाजे यांनी याबाबत आपणास काहीच माहिती नसून आपण संबंधितांना विचारून सांगू, अशीच प्रतिक्रिया दिली. सभापती गौरीताई कुंजीर यांनी मूल्यांकनाची पद्धत चुकीची असून, त्याबाबत आपणास काहीच प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)
मूल्यांकनाचा निव्वळ फार्स
By admin | Published: January 26, 2016 1:44 AM