रहाटणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बॅँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. बॅँकांमधून पुरेशा प्रमाणात पैसे मिळत नसल्याने तसेच एटीएममध्ये नंबर येईपर्यंत पैसे मिळेलच याची शाश्वती नसल्याने नागरिकांना व्यवहारासाठी काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांचा कल नेट बॅँकिंगद्वारे व्यवहार करण्याकडे वाढत असल्याचे चित्र आहे. मोठे मॉल, हॉटेल, किराणा दुकान यासह नागरिक सर्रास नागरिक डेबिट व क्रेडिट कार्डाचा वापर करताना दिसून येत आहे. नेट बँकिंगच्या पूर्वीच्या तुलनेने दुपटीने वाढ झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. बॅँकेत आपल्या जवळील पैसे नवीन चलनाप्रमाणे बदलून मिळत असले, तरी सुट्या पैशांअभावी नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन वेतन मिळण्याच्या दिवसातच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने तारांबळ उडाली आहे, तर नेट बँकिंगमध्ये गैरप्रकाराची भीती मनात बाळगून अनेक जण नेट बँकिंग व्यवहार करण्यास अनेकजण धजावत नव्हते. मात्र सर्वच पर्याय बंद झाल्याने नागरिक सध्या नेट बँकिंगकडे वळले आहेत. अनेक महिला सध्या किराणा दुकानात डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हाताळताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे किराणा दुकानदार, दूधवाला, तसेच इतर दैनंदिन खर्चाकरिता पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम केंद्र तसेच बॅँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक मोबाइल रीजार्च, टेलिफोन व वीजबिल भरण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत आहे. यावर उपाय म्हणून अनेक ग्राहक इंटरनेटद्वारे भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. बाजारपेठेत सुटे पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेक दुकानदारही सुटे पैसे देण्यास असमर्थ ठरत आहेत. सुट्या पैशांचा सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने अनेक मोबाइल ग्राहकांनी इंटरनेट बॅँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून रखडलेले मोबाइल बिल भरले. तसेच आपले मोबाइल रीचार्ज करून घेत आहेत. वीजबिल किंवा मोबाइल बिलप्रमाणे पेट्रोलपंपावरही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरणा नागरिकांनी तसदी घेतली, तर सुट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबू शकेल. (वार्ताहर)
नेट बँकिंगकडे कल; गर्दी ओसरली
By admin | Published: November 17, 2016 3:19 AM