पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १) जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ४७ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ६ हजार १७१ विद्यार्थ्यी ज्युनिअर रिसर्च फेलोशीपसाठी (जेआरएफ) पात्र ठरले आहेत.
ही परीक्षा २४ सप्टेंबर आणि १३ नोव्हेंबर अशी दोन सत्रांमध्ये झाली. देशभरातील १ हजार ११९ केंद्रांवर ५ लाख २६ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ८ लाख ६० हजार ९७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षेचा निकाल १७ दिवसांतच जाहीर करण्यात आला आहे.
सहायक प्राध्यापक पदासाठी १ लाख ४० हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ८४८ विद्यार्थी पात्र ठरले. जेआरएफ आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी एकत्रित नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार १३८ विद्यार्थी केवळ प्राध्यापक पदासाठी तर, ६ हजार १७१ विद्यार्थी जेआरएफसाठी पात्र ठरले आहेत.
केवळ सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेल्या ३६ हजार १३८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २९ विद्यार्थ्यांना नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल्ड कास्ट स्टुडंट्स, ४३१ विद्यार्थ्यांना नॅशनल फेलोशिप फॉर आदर बॅकवर्ड क्लासेस आणि ४७५ विद्यार्थ्यांना मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप फॉर मायनॉरिटी स्टुडंट्स या फेलोशिप मिळणार आहेत.
--------------