पुणे : पुरस्कार ही प्रत्येक कलाकारासाठी कामाची पोचपावती असते. अरुण दाते यांनी एकाहून एक सरस रचनांमधून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मात्र, शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने अरुण दाते यांच्यासारख्या सर्वोच्च कलाकाराची शासनदरबारी उपेक्षा झाली, अशी खंत कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अरुण दाते यांनी संगीत क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. एकीकडे नवोदित कलावंतांना पद्म पुरस्कार मिळत आहेत; अशा वेळी राष्ट्रीय पातळीवरील पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांसाठी दातेंच्या नावाचा विचार व्हायला हवा होता, अशा भावना व्यक्त झाल्या. कला, साहित्य आणि संगीताचा सन्मान करण्याची भूमिका जपण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. अशा वेळी अरुण दाते यांचा सन्मान करण्याचे शहाणपण शासनाला सुचले नाही, असेही कलाकारांनी सांगितले.अरुण दाते यांनी गायकीतून स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. मात्र, शासनाकडून राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही पुरस्कारासाठी त्यांची दखल घेतली गेली नाही. अरुभय्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला नाही, याची त्यांना कधीच खंत वाटली नाही. पुरस्कार मिळाला तरच आपण मोठे होतो असे नसते, अशी त्यांची भावना होती. रसिकांचे प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होते.- अजय धोंगडे, ज्येष्ठ तबलावादकआपल्या विलक्षण गायकीतून अरुण दाते यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. रसिकांवर त्यांनी कायम स्वर-सुरांची बरसात केली. मराठी भावगीतांचे विश्व त्यांनी समृद्ध केले. या मोलाच्या योगदानाबद्दल अरुण दाते यांना शासनाचा पुरस्कार निश्चितच मिळायला हवा होता.- श्रीधर फडके, ज्येष्ठ गायक
अरुण दातेंची शासनदरबारी उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:15 AM