लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोना विषाणूचा विळखा सगळ्या शहराभोवती घट्ट पडत असताना शहराच्या व जिल्ह्याच्याही सगळ्या सीमा मोकळ्याच आहेत. रेल्वे, बसस्थानकातून रोज हजारो प्रवासी परजिल्ह्यातून शहरात येत असूनही त्यांची तपासणी होताना दिसत नाही किंवा कसली नोंदही केली जात नाही.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची रोजची आकडेवारी सांगत आहे. शहर परिसरात होत असलेल्या स्वॅब तपासणीत कोरोना संसर्गित रूग्णांची संख्या आता २ हजारांवर गेली आहे. मात्र प्रशासनात त्याचे गांभीर्य फक्त चर्चेतच दिसते आहे.
परजिल्ह्यातून आलेल्यांची तपासणी करणे, नोंद ठेवणे, रूग्ण आढळल्यास त्याचे विलगीकरण करणे या साध्या उपाययोजनाही केल्या जात नाहीत.
शहरात पुणे व शिवाजीनगर अशी दोन रेल्वे स्थानके आहेत. पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) तीन बसस्थानके आहेत. त्याशिवाय पिंपरी चिंचवड मधील रेल्वे व बसस्थानके वेगळी. यापैकी रेल्वे प्रशासानाने केलेली प्राथमिक उपाययोजना वगळता कुठेही कसलीही काळजी घेतली जाताना दिसत नाही.
प्रवासी जातात, येतात, त्यांंना ना कोणी कसली विचारणा करते, ना कसली तपासणी होते. नावनोंदणी वगैरे तर दूरच! त्यासाठी कर्मचारी नाहीत. एसटीचे चालक वाहकच विनामास्क दिसतात. सॅनिटायझर औषधालाही नाही. एसटी आली की प्रवाशांची गर्दी ठरलेलीच. तिथे शिस्त नावालाही नाही. दिवसा ही स्थिती, रात्री तर यापेक्षाही वाईट अवस्था आहे. विशेषतः एसटी स्थानकांमध्ये रात्री कोणाचेही लक्ष नसते. लांबच्या गावांहून येणारे प्रवासी गाडीतून स्थानकात ऊतरून सरळ बाहेरचा रस्ता धरतात.
शहराच्या कात्रज, येरवडा वगैरे उपनगरातील सीमांवरही खासगी गाड्यांची, आतील प्रवाशांची कसलीही तपासणी केली जात नाही. तशी काहीही व्यवस्थाच नाही. पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते तशी व्यवस्था असण्याची गरज असतानाही सर्व सीमा मोकळ्याच आहेत.
रेल्वे स्थानकात प्राथमिक व
व्यवस्था
रेल्वे स्थानकात प्राथमिक व्यवस्था
रेल्वेने फलाट तिकीट ५० रूपये केले आहे. तसेच प्रवास करणाऱ्याशिवाय इतरांना अगदीच गरज असेल तरच फलाटावर प्रवेश दिला जातो. प्रवाशांना मास्क सक्तीचा केला आहे. तरीही रोजचे २५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी जाययेत असल्याने त्यांच्या नोंदी वगैरे होत नाहीत, मात्र मास्क नसेल तर रेल्वेचे कर्मचारी त्यांना हटकतात व मास्क घालायला लावतातच.
------
एसटी स्थानकांमध्ये आनंदच
एसटीच्या शहरातील तिन्ही स्थानकांवर आनंदीआनंदच आहे. तिन्ही ठिकाणी रोजची लाखभर प्रवाशांची ये-जा आहे. कसलीही नोंद होत नाही. मास्क अनेकदा नसतोच व असला तरी तो गळ्यात अडकवलेला असतो. सॅनिटायझरचे स्थानकांमधील स्टँड कोरडे पडलेले असतात, तिकडे कोणी फिरकतही नाही.
-----
सीमा मोकळ्याच
जिल्ह्यात व शहरात येणारे सर्व रस्ते दिवसा व रात्रीही मोकळेच असतात. तिथेही खासगी वाहनांची, प्रवाशांची तपासणी वगैरे होत नाही.
------
पुणे शहर व जिल्हा सर्व क्षेत्राचे केंद्र असल्याने रोजचे काही लाख प्रवासी इथे येत असतात. ही संख्या लक्षात घेतल्यास प्रशासनाला मर्यादा येतात. मात्र तरीही रेल्वे, एसटी पोलिस यांना सूचना केलेल्या आहेत. शंका आल्यास त्यांच्याकडून त्वरीत दखल घेतली जातेच. आता अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.
राजेश देशमुख- जिल्हाधिकारी, पुणे.