पुणे : पुणेकरांच्या नेहमीच चर्चेचा आणि टीकेचा विषय राहिलेल्या पीएपीच्या ताफ्यात आता आणखी 50 ई- बसेस दाखल झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट तसेच ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थिीत या बसेसचे लाेकार्पण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसमाेर सकाळी 10 वाजता हा साेहळा पार पडला. पीएमपीच्या ताफ्यात 12 मीटर लांबीच्या एसी ई बसेस दाखल झाल्याने पुणेकरांचा प्रवास आता आणखी गारेगार हाेणार आहे. या आधी 9 मीटर लांबीच्या 25 ई बसेस ताफ्यात दाखल झाल्या हाेत्या.
स्वातंत्र्यदिनी पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. त्यात 50 ई बसेस तर 50 सीएनजी बसेसचा समावेश आहे. या बसेसच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नव्हती. अखेर राज्यातील पूरस्थितीमुळे या कार्यक्रमास येण्यास मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दर्शविल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते या बसेसचे लाेकार्पन करण्यात आले. ताफ्यात नवीन दाखल झालेल्या ई बसेस या 12 मीटरच्या असून या एसी बसेस आहेत. बीआरटी मार्गात या बसेस धावणार आहेत.
या बसेस संपूर्ण ऑटाेमॅटिक आहेत. पावर स्टेअरिंग तसेच ऑटाे गेअर शिफ्ट टेक्नालाॅजी या बसमध्ये आहे. त्याचबराेबर आपत्कालिन परिस्थितीसाठी प्रवाशांसाठी या बसमध्ये पॅनिक बटण देखील आहे. 32 प्रवासी क्षमता या बसमध्ये आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तूब्बल 300 ते 350 किलाेमीटर ही बस धावू शकणार आहे. ई बस असल्याने प्रदूषण हाेणार नाही.