पुणे : येरवडा कारागृहात काही डॉक्टर, अभियंते, वकील आणि विविध विषयांतील पदवीधर शिक्षा भोगत आहेत. त्यातील चांगले संभाषण कौशल्य असलेल्या ४० आरोपी व कैद्यांंना मानसिक आरोग्याविषयक समुपदेशन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कैद्यांच्या आत्महत्या आणि आत्महत्येची प्रवृत्ती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कैदी आणि खटला सुरू असलेल्या आरोपींचे समुपदेशन करण्यासाठी हे ५० तासांचे हे सर्वसमावेशक प्रशिक्षण शिबिर पार पडले.
‘पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’, ‘किंगिंग यूथ फाउंडेशन आणि ‘ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या वतीने ‘साथी’ या समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण घेतलेले कैदी इतरांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणार आहेत.
बलात्कार आणि खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने गेल्या आठवड्यात कारागृहात आत्महत्या केली होती. तसेच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गेल्या वर्षी जुलैमध्ये कारागृहात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. हे प्रकार टाळण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारागृहात काही डॉक्टर, अभियंते, वकील आणि विविध विषयांतील पदवीधर शिक्षा भोगत आहेत. त्यातील चांगले संभाषण कौशल्य असलेल्या ४० आरोपी व कैद्यांना मानसिक आरोग्याविषयक समुपदेशन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गेले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षकांद्वारे मूल्यमापन केले जाईल. त्यानंतर ते इतर कैद्यांचे समुपदेशन करतील, असे ग्लोबल केअर फाउंडेशनचे संस्थापक अबिद अहमद कुंडलम यांनी सांगितले.
‘‘कैद्यांना नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. कारागृह ही अशी ठिकाणे असावीत जिथे कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी. कैद्यांच्या मानसिकतेत सुधारणा होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घेतली आहे.’’
- सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण