लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजची निरीक्षणशैली बदलली आहे. चित्रकलेतही नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहे. कलेच्या साधनेत एक वेगळेच समाधान कलाकाराला लाभत असते. चित्रकाराला स्वत:च्या निरीक्षणशक्तीस सतत जागरूक ठेवावे लागते. यातूनच त्याला नवीन कलाकृती मिळत असतात, असे मत चित्रकार डॉ. गोरखनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त ससून रुग्णालयामध्ये गुरुवारी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी डॉ. कांबळे बोलत होते. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अधिसेविका राजश्री कोरके यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्या कांबळे, उषा शिंदे, मृणाल देशपांडे, चारुलता पाटील, डॉ. संगीता भुजबळ, हेमा थोपटे, मानसी सोनवणे आदी उपस्थित होत्या. कोरके म्हणाल्या, ‘‘आरोग्याच्या प्रश्नांच्या संदर्भात प्रकाश टाकणारी, महत्त्वाचे संदेश देणारी, प्रेक्षकांना विचार करायला लावणारी चित्रे आहेत. डॉ. कांबळे यांची रेखाटने आणि कल्पकता कौतुकास्पद आहे.’’ डॉ. कांबळे यांनी परिचारिकांना व्यवसायमध्ये समाजात सन्मान मिळावा म्हणून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी जे कार्य केले त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून चित्रप्रदर्शन साकारले आहे. प्रत्येक चित्रातून आरोग्य, शिक्षण मिळावे हा संदेश त्यांनी पोस्टरमार्फत दिला असल्याचे मत परिचारिकांनी व्यक्त केले.विद्या कांबळे यांनी सांगितले की, ‘‘माझे काही विचार चित्रातून मांडले आहेत. या चित्रांमध्ये पुढील १०० वर्षांत पारिचारिकांचे स्वरूप काय असू शकेल, याबाबतची स्थिती मांडण्यात आली आहे.’’
निरीक्षणातून नव्या कलाकृती
By admin | Published: May 12, 2017 5:35 AM