पुणे : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे. पुण्याच्या या संस्कृतीमध्ये आता नाटक आणि शास्त्रीय संगीताबरोबरच विविध बॅण्ड ग्रुपने आपली जागा निर्माण केली आहे. तरुणाईला आकर्षित करणारे व आपल्या तालावर थिरकायला लावणारे अनेक म्युझिकल बॅण्ड पुण्यात तयार होत असून त्यांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये कॉस्मोपॉलिटन कल्चर रुजतंय. भारतातील विविध प्रांतातील लोक आता पुण्यात स्थायिक होत आहेत. आयटी हब अशी ओळख मिळाल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्याही पुण्यात अधिक आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, हिंजवडी या भागांमध्ये कॅफेंची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कॅफेंमध्ये आता शहरातील विविध बॅण्डच्या कॉन्सर्टस आयोजित केल्या जात आहेत. या बॅण्डची नावंही विलक्षण आहेत. मिसरी बॅण्ड, दी मर्सी बीट बॅण्ड, रागा लॉजिक बॅण्ड ही त्यातील काही प्रातिनिधिक नावं आहेत. अगदी रॉक संगीतापासून ते मराठी संगीतापर्यंत सर्व प्रकारचं संगीत या बॅण्डमध्ये वाजवलं जात आहे. अनेक गाण्यांमध्ये त्यांच्या संगीतामध्ये विविध प्रयोग केले जात असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रत्येक बॅण्डची स्वत:ची वेगळी खासियत आहे. त्यांची सादरीकरणाची तसेच वाद्यांच्या निवडीही वेगवेगळी असते. पुण्यातील प्रसिद्ध बॅण्ड्समध्ये वादन करणारा सिद्धांत बोरावके म्हणाला, बॅण्ड कल्चर हळूहळू आता आपल्याकडे रुजण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका, इंग्लंडमध्ये १९६० च्या दशकात विविध ठिकाणी बॅण्ड्सचे वादन होत असे. पुण्यात होणाऱ्या कॉर्न्स्टसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक बॅण्डची त्याची स्वत:ची खासियत आहे. त्यांच्या प्रेक्षकही वेगवेगळा आहे. पुण्यात या बॅण्ड्सच्या सादरीकरणांसाठी विविध जागा निर्माण होत आहेत. जयदीप वैद्य म्हणाला, बॅण्डसच्या सादरिकरणांमध्ये आता अनेक बदल झाले आहेत. प्रेक्षकांना आता नवीन काहीतरी हवं आहे. सादरिकरणातील वेगळेपणा प्रेक्षकांना भावतोय. त्यामुळे आम्हा कलाकारांसाठी हे आव्हानात्मक जरी असलं तरी यात आनंदही मोठा आहे. कलाकाराने नेहमी नव्याचा शोध घ्यायला हवा.
पुण्यात रुजतेय बॅण्ड कल्चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 8:43 PM
पुण्यामधील विविध कॅफे व मॉल्समध्ये म्युझिक कॉन्सर्टसे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील अनेक म्युझिक बॅण्डस सादरीकरण करीत असून तरुण कलाकारांना यानिमित्ताने एक व्यासपीठ निर्माण होत आहे.
ठळक मुद्देशहरातील विविध भागात होतायेत म्युझिक कॉर्न्स्टसतरुणांना या निमित्ताने मिळतंय एक नवं व्यासपीठ