लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले असून तिथे महापौर कार्यालय, नगरसचिव कार्यालय व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असणार आहेत. या कार्यालयांमध्ये फर्निचर तयार करण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांच्या खर्चाला बुधवारी मान्यता देण्यात आली.महापालिकेच्या जुन्या इमारतीची जागा अपुरी पडू लागल्याने पाठीमागील जागेत विस्तारित इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीमध्ये मुख्य सभेचे सभागृह, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नगरसचिवांचे कार्यालय असणार आहे. या ठिकाणच्या फर्निचरसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच विस्तारित इमारतीमध्ये कार्यालयांची स्थलांतरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरून होणारे वादही यामुळे संपुष्टात येऊ शकतील. अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी जिना, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ नागरिकांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी ३४ लाख रुपये खर्च करून जिना बांधण्यात येणार आहे. या ठिकाणच्या उड्डाणपुलाचे काम वास्तविक अंतिम टप्प्यामध्ये आहे. उड्डाणपुलाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असताना त्या खर्चात यामुळे आणखी भर पडली आहे. पुलाचा आराखडा तयार करताना या बाबींचा विचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
नव्या इमारतीचे फर्निचर; सव्वा कोटीचा खर्च
By admin | Published: June 22, 2017 6:54 AM