राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व मंचर पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारती मंजूर झाल्या आहेत. घोडेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या. तसेच मंचर पोलीस ठाण्यासाठी इमारत नव्हती व निवासस्थानेदेखील नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या इमारतींना प्रशासकीय मंजुरी घेतली आहे.
यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांच्यासाठी निवासस्थाने, तसेच यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, गटाराची पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, संरक्षक भिंत, गेट, रेनवॉटर हार्वेस्टिंग, बागबगीचा, पंप हाऊस, सीसीटीव्ही, सोलर, अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत रस्ते, वाहनतळ अशा स्वरूपाचे काम होणार आहे.