पिंपरी : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधाकर नागनुरे यांनी सोमवारी प्रथमच निगडी प्राधिकरणातील कार्यालयास भेट देत कार्यालयाची पाहणी केली. फर्निचर व इतर काही तांत्रिक बदल करण्याबाबतच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळामध्ये केलेल्या घोषणेनुसार १ एप्रिलला पीएमआरडीएची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ‘पीएमआरडीए’चे कार्यालय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या सीईओपदी नागनुरे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांनी पुण्यात पदभार स्वीकारला. शनिवारी ते पुण्यातच होते. सोमवारी प्रथमच कार्यालयात आलेल्या नागनुरे यांनी इमारतीची पाहणी केली. आकुर्डी रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या प्राधिकरणाच्या भव्य इमारतीत ‘ए’ आणि ‘डी’ ब्लॉक आहेत. यातील ‘डी’ ब्लॉकमध्ये सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे कामकाज सुरू आहे. तर ‘ए’ ब्लॉकमधील सातही मजले रिकामे आहेत. या ‘ए’ ब्लॉकमध्येच पीएमआरडीचे कामकाज करण्याचे नियोजित आहे. त्यानुसार ‘ए’ ब्लॉकमधील मजल्यांची सोमवारी पाहणी करण्यात आली. तळमजल्यात सीईओंचे कार्यालय असेल. तसेच इतर मजल्यांवर विविध विभागांचे कामकाज चालणार आहे. २५ सदस्यीय समिती असल्याने या पाहणीवेळी नागनुरे यांनी विशेषत: बैठक कक्षाबाबतच माहिती जाणून घेतली. तळमजल्यात प्रशस्त सभागृह उपलब्ध नाही. त्यामुळे सातव्या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची पाहणी केली. या सभागृहात सुमारे ५० जण व्यवस्थित बसू शकतात. यावर त्यांनी समाधानही व्यक्त केले. (प्रतिनिधी)
नव्या सीईओंनी केली पाहणी
By admin | Published: April 07, 2015 5:40 AM