पुणे : स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लाल (लाला लाजपत राय), बाल (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक) आणि पाल (बिपिन चंद्र पाल) यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इतिहास घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र-पंजाब संबंध अधिक दृढ झाले असले तरी महाराष्ट्र-बंगाल संबंध अधिक विकसित होऊ शकलेले नाहीत. हे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले, 'भाषा, साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांच्या वैयक्तिक लोक-लोक संपर्कांवर या वर्षी भर दिला जाणार आहे. दोनही राज्यांत विविध कार्यक्रम आयोजित करून लोक चळवळ सुरू केली जाईल. त्यासाठी दोन्ही राज्यातील लेखक, कवी, नेते आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. आम्ही पंजाबी, बंगाली आणि मराठी भाषेतून सुमारे ५० पुस्तकांचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.'
…..............
ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदरसिंग, उद्धव ठाकरे या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांचे वंशज अनुक्रमे अॅड. अनिल अग्रवाल, शैलेश आणि डॉ. दीपक टिळक आणि दीप पाल यांची उपस्थिती असणार आहे. या काळात तीन स्वातंत्र्यसैनिकांचे वंशजही विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सुरू होईल आणि योगी श्री अरबिंदो घोष यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.