राजू इनामदार
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड परिवाराचा पुणे जिल्हा आणि पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध आहे. पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात चंद्रचूड यांचा एक वाडाच असल्याचे जुन्या पिढीतील लोक सांगतात. त्याशिवाय त्यांचे मूळ गाव असलेले कनेरसर (ता. खेड) येथील वाडा तर अजूनही आपले अस्तित्व ठेवून आहे.
यशवंतराव चंद्रचूड नूतन मराठी विद्यालयाचे विद्यार्थी. पुढे शिक्षण घेत ते प्रथम उच्च न्यायालयाचे व नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. आता त्यांचेच चिरंजीव असलेले धनंजयराव यांनीही तेच पद मिळवले आहे. या परिवाराबरोबर जुन्या काळात निकटचा स्नेह असलेले त्यावेळचे शालेय विद्यार्थी प्रा. प्रकाश भोंडे चंद्रचूड यांच्या त्या वाड्यात जात असत. धनंजय यांचा जन्म पुण्यातलाच, असे ते म्हणाले. यशवंतराव उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्याने त्यांच्याबरोबर वागता-बोलताना सर्वजण शिष्टाचार पाळून बोलत असत, असे त्यांनी सांगितले.
पुढे यशवंतराव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्याने त्यांचा पुण्यातील संपर्क तुटला. तो वाडाही काळाच्या ओघात अस्तंगत झाला, मात्र, यशवंतराव त्या काळात अधूनमधून पुण्याला भेट देत असत. विद्या सहकारी या बीएमसीसीतील प्राध्यापक मंडळींनी स्थापन केलेल्या बँकेला भेट देण्यासाठी एकदा त्यांना बोलावले होते. न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ते निमंत्रण मान्य केले. १९८५ मध्ये त्यांनी सहपरिवार बँकेच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी धनंजयराव उपस्थित होते, असे प्रा. भोंडे म्हणाले.
यशवंतराव आधी मुंबईत व नंतर दिल्लीत गेल्यामुळे धनंजयरावांचाही पुणे शहराशी फारसा संपर्क राहिला नाही. नंतरच्या काळात तेही मोठ्या पदावर गेल्यामुळे त्यांच्याबाबतीतही शिष्टाचार पाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला व संपर्क तुटला, असे प्रा. भोंडे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात. सुनंदा चंद्रचूड यांनी सांगितले की, २०१७ मध्ये धनंजयराव चंद्रचूड यांनी कनेरसर गावास व त्यांच्या वाड्यास भेट दिली होती. गावकऱ्यांना यशवंतराव व धनंजयराव या पिता-पुत्रांविषयी चांगलाच अभिमान आहे.
राज्यात सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिक
गावातील काहीजणांनी सांगितले की, यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन १९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. पितापुत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याबरोबरच राज्यात एलएल.बी. परीक्षेत सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिक चंद्रचूड परिवाराच्या नावावर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.