पुणे :ब्लड बँक किंवा मिल्क बँक तुम्ही ऐकली असेल, पण पुण्यात सुरु झाली आहे रोटी बँक. रोटी बँक ही संकल्पना वेगळी असली तरी त्याचा उपयोग मात्र भुकेल्यांची क्षुधा भागवण्यासाठी करण्यात येतो आहे. विश्वशांती संस्थेचे निलेश शेलार आणि अमित शिंदे यांनी रास्तापेठेत हा आगळावेगळा उपक्रम सुरु केला आहे. सध्या अपोलो थिएटरजवळ असणाऱ्या कर्मप्रयत्नेश्वर मित्र मंडळाच्या जागेत दुपारी १ ते ३ या वेळेत रोटी बँक सुरु आहे.पैसे नाहीत म्हणून कोणत्याही व्यक्तीला उपाशी राहू नये असा रोटी बँकेमागचा उद्देश असून त्यासाठी लोक देतील तेवढे पैसे किंवा धान्य देतील त्याचा स्वीकार करण्यात येतो. अगदी घरून डबा घेतला आणि अचानक बाहेर जेवायचा बेत ठरला तर अन्न वाया जाण्यापेक्षा फक्त १ एप्रिलपासून सुरु केलेल्या बँकेला प्रचंड प्रतिसाद वाढत असून पहिल्या दिवशी दीडशे लोकांनी लाभ घेतला तर चार दिवसात ही संख्या तीनशेवर पोचली आहे. एक पैसाही न आकारता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोळी भाजी दिली दिली जाते. इथे अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे, निलेश शेलार आणि अमोल शिंदे यांनी सुरु ही संकल्पना राबवली असून त्यात अनेकजण मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. पहिल्या दिवशी तर दीडशे लोकांच्या जेवणाची तयारी ठेवली होती. मात्र लोकांचा प्रतिसाद बघता आयोजकांना अजून पिठलं पोळी आणावी लागल्याची आठवण त्यांनी सांगितली. शिंदे यांनी समाजात अशा संकल्पना राबवण्याची गरज असल्याचे सांगितले. हल्ली कोणी भुकेने तडफडत नाही असे आपल्याला वाटत असते. पण प्रत्यक्षात बँक सुरु केल्यावर होणारी गर्दी बघता अजूनही अनेकजण अन्नाविना दिवस काढतात असे समोर आल्याचे ते म्हणाले. हळूहळू अनेकजण स्वतःहून मदत करत असून अनेक तरुण पुढे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुकेल्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमाचे पुण्यात कौतुक होताना दिसत आहे.