पुणे : ब्रिटनमधील काही प्रवासी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रातही गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून शेकडो प्रवासी आले. यातल्या कोरोनाबाधित प्रवाशांच्या नमुन्यांची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेत (एनआयव्ही) केली जाणार आहे. महाराष्ट्रात केवळ ‘एनआयव्ही’मध्येच ही तपासणी करून नव्या स्वरुपातील ‘कोविड-१९’च्या संसर्गाचे आगमन झाले आहे का यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
देशात यंदाच्या जानेवारीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ‘एनआयव्ही’मध्येच नमुन्यांची तपासणी केली जात होती. कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासलेला नमुना ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर त्याची खातरजमा ‘एनआयव्ही’त केली जात होती. त्यामुळे सुरूवातीला प्रयोगशाळेवरील ताण प्रचंड वाढला. त्यानंतर देशभरात प्रयोगशाळांचे जाळे वाढत गेले. पण त्यांच्यासाठी ‘एनआयव्ही’ आणि ‘आयसीएमआर’ने निश्चित केलेले निकष बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार आरटी-पीसीआर तपासण्या केल्या जात आहेत. पण ब्रिटनमध्ये कोरोना विषाणुचा नवीन प्रकार आढळून आल्याने पुन्हा एकदा ‘एनआयव्ही’ प्रकाशझोतात आली आहे.
ब्रिटनमधून दि. २५ नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासन व महापालिकांना पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यांची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीमध्ये पाठविण्यात येणार आहे. नागपुरमधील एका प्रवाशाचे नमुनेही ‘एनआयव्ही’मध्ये पाठविण्यात आले होते. त्यानुसार यापैकी बाधित आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने तपासले जाणार आहेत. राज्यात केवळ एनआयव्हीमध्येच ही तपासणी होणार आहे. ‘एनआयव्ही’सह देशात केवळ पाच प्रयोगशाळांमध्ये ही तपासणी होणार असल्याची माहिती राज्य साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
चौकट
हे तपासणार एनआयव्ही
कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत (आरएनए) अनेकदा बदल झाले आहेत. पण ब्रिटनमधील आढळून आलेला नवीन प्रकार अधिक संसर्ग पसरवणारा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या नवीन विषाणुच्या जनुकीय रचनेची पडताळणी ‘एनआयव्ही’त केली जाईल. भारतातील विषाणुची जनुकीय रचना, ब्रिटनहून आलेल्या बाधित रुग्णाच्या नमुन्यातील विषाणुची जनुकीय रचना आणि ब्रिटनमधील नवीन विषाणुच्या जनुकीय रचना याचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल.