प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोमवारी पीएमपीच्या नव्या ई बसची चाचणी पूर्ण झाली. सलग सात दिवस रोज १२ तास गाडीत साडे तीन टन वजनाचे वाळूचे पोते ठेवून शहराच्या वेगवेगळ्या मार्गावर ही बस फिरविण्यात आली. यावेळी गाडीचा वेग, वातानुकूलित यंत्रणा, चेसीची सुरक्षितता, वळणावरची गाडीची स्थिती आदी बाबी तपासण्यात आल्या. दोन दिवसांत सीआयआरटी आपला अहवाल पीएमपीला सादर करेल. अहवालात जर काही सूचना असतील तर त्या संबंधित कंपनीस सांगितल्या जातील. जर सूचना नसतील तर बसच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल.
सीआयआरटी व पीएमपीच्या पथकाच्या उपस्थित वेगवेगळ्या स्तरावर चाचणी घेण्यात आली. मागील दीड महिन्यापूर्वी हैद्राबाद येथून चाचणीसाठी पीएमपी कडे ई-बस दाखल झाली होती. मात्र संचारबंदीमुळे चाचणी घेण्यात अडचण येत होती. अखेर प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याने सोमवार (दि.१०) ते सोमवार (दि. १७) या दरम्यान ही चाचणी पार पडली. चाचणी पूर्ण झाल्याने नव्या ५०० बसचा मार्गातील मोठी अडचण दूर झाली.
५०० नवे इ बस :
पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास अधिक सुसह्य व्हावा याकरिता पीएमपी ५०० नवे इ बस घेत आहे. यातील ३५० बस पुणे महापालिका उपलब्ध करून देणार आहे तर उर्वरित १५० बस ह्या केंद्र शासनाच्या फेम २ या योजनेतील आहेत. हैद्राबाद येथील इलेक्ट्रा नावाची कंपनी ह्या बसचे उत्पादन करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यातील ७५ बस पीएमपीला मिळणार होते. मात्र त्याच्या चाचणीला विलंब झाल्याने सप्टेंबर महिन्यात बसची पहिली खेप मिळण्याचा अंदाज आहे. ही बस १२ मीटर लांब असून एका बसची किंमत १ कोटी ९५ लाख इतकी आहे.
कोट
सात दिवस सुरू असलेली चाचणी आज पूर्ण झाली. बस संदर्भात सीआयआरटी ही संस्था अहवाल सादर करेल. अहवालात सूचना नसतील तर लवकरात लवकर बस मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य होईल.
- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल