पुणे: पुणे एसटी विभागाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक शिवनेरी बस पुणे स्टेशन ते दादर मार्गावर धावायला आजपासून सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी सव्वापाच वाजता पहिली ई-शिवनेरी दादरकडे रवाना करण्यात आली. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच १० ई-शिवनेरी दाखल झाल्या होत्या. त्यातील ५ पुणे विभागाला तर अन्य ५ मुंबई विभागाला देण्यात आल्या होत्या.
या १० ई-शिवनेरी बसद्वारे दिवसभरात १५ फेऱ्या पुणे स्टेशन येथून दादरकरिता सुटतील. आणि १५ फेऱ्या दादर येथून पुणे स्टेशन करीता सुटणार आहेत. या बस औंध, निगडी मार्गे दर तासाला उपलब्ध असणार आहेत. या बसचे दर अन्य शिवनेरी एवढेच असणार आहेत. शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे व अन्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या पहिल्या ई-शिवनेरीला हिरवा झेंडा दाखवला.
ज्येष्ठांसह, महिलांना सवलत मिळणार..
अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरीक तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात या प्रवाशांना तिकीटाचा लाभ घेता येणार आहे.