लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवाशांना आता कमी तिकीट दरात वातानुकूलित डब्यांतून प्रवास करता येणार आहे. कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीत
नवीन इकॉनॉमिक शंभर एसी डबे तयार झाले असून, त्यातल्या १५ डब्यांचा एक रेक रवाना देखील करण्यात आला.
रेल्वे मंत्रालयाने नवीन इकॉनॉमिक एसी डबे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कपूरथला येथील डबा तयार करणाऱ्या कारखान्यास डबे तयार करण्याचा आदेश देण्यात आला होता.मार्च महिन्यात याचा प्रोटोटाईप तयार केल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात जवळपास १०० डबे तयार करण्यात आले. या डब्यांचे वैशिष्ट्य असे की, याच्या आसन क्षमतेत वाढ करण्यात आली. मात्र त्यासाठी डब्यांच्या लांबीत अथवा रुंदीत कोणताही बदल करण्यात आला नाही. शिवाय, दिव्यांगांना सहजरीत्या प्रवास करता यावा याकरिता डब्यांचे चारपैकी दोन दरवाज्यांची लांबी थोडी वाढविण्यात आली.
रेल्वे बोर्डने यापूर्वी गरीब रथमध्ये बर्थची संख्या वाढविली होती. मात्र, त्याचा त्रास प्रवाशांना होऊ लागल्याने रेल्वे बोर्डाने गरीब रथच्या डब्याचे उत्पादन थांबविले. तसा त्रास पुन्हा ह्या डब्यांतील प्रवाशांना होऊ नये म्हणे म्हणून बेडरोल कॅबिनेट काढण्यात आले. त्याच्या जागेचा वापर बर्थसाठी झाला.सध्या एसी ३ टियरमध्ये ७२ बर्थ आहेत.नव्या डब्यांत ८३ बर्थ असणार आहे. म्हणजे एका डब्यात ११ अतिरिक्त सीट्स तयार होऊन ११ अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे.याचा फायदा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना होईल. शिवाय रेल्वेचे तिकिटातून मिळणारे उत्पन्न देखील वाढणार आहे. बर्थची संख्या वाढल्याने सामान्य एसी थ्रीच्या तुलनेत ह्या डब्यातील तिकीट दर कमी असणार आहे.
कोट - कोविडच्या काळात कर्मचारी संख्येवर मर्यादा होती. तरी देखील आम्ही अशा विपरीत परिस्थितीत अवघ्या दोन महिन्यांत १०० डबे तयार केले. पैकी १५ डबे सोमवारी रेल्वे बोर्डच्या ताब्यात देण्यात आले.
जितेश कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथला ,पंजाब.