- नारायण बडगुजर
पिंपरी : डिजिटल व्यवहार वाढत असताना त्यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना अनेकांना सहज गंडा घातला जात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार करताना साशंकता वाढत आहे. याबाबत तक्रारी देखील केल्या जात आहेत. मात्र, तपास होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आता सायबर चोरट्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यावसायिकांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
चहाच्या टपरीपासून ते कंपन्या तसेच मोठ्या उद्योग समूहांपर्यंत बहुतांश व्यवहार हे डिजिटल पद्धतीने केले जातात. यात व्यावसायिकांकडे स्कॅनर उपलब्ध असतो. त्यावरून व्यवहार होतो. कुदळवाडी, चिखली येथील कृष्णा आदिनाथ शेळके, असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे कुदळवाडी येथील कृष्णा मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. मनी ट्रान्सफर, मोबाईल ॲक्सेसरीज, मोबाईल कॅश विड्रॉल आदी सेवा या दुकानात उपलब्ध आहेत. आर्थिक व्यवहारांसाठी स्कॅनरचाही वापर केला जातो. त्यात ग्राहकाने पैसे पाठवल्यास त्याला रोख स्वरुपात रक्कम दिली जाते. शेळके यांच्या दुकानातील स्कॅनरवरून व्यवहार करून ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. त्यासोबतच त्यांच्या खात्यातून चुकीचे व्यवहार झाले, असे सांगून बँक खाते ‘सिझ’ करण्यात आले. त्यामुळे शेळके मोठ्या अडचणीत आले आहेत. याबाबत संबंधित व्यावसायिकाने ऑनलाइन तक्रार नोंदवली. मात्र, अद्याप व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणात कोणताही तपास झालेला नाही. त्यामुळे ते हतबल झाले आहेत.
...असा घडला प्रकार
कृष्णा शेळके यांच्या दुकानात २६ मे २०२३ रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्हाला रुग्णालयात पैसे जमा करायचे आहेत. त्यासाठी रोकड पाहिजे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार शेळके यांनी त्यांच्या दुकानातील ‘स्कॅनर’चा फोटो संबंधित व्यक्तींना पाठवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी स्कॅनरचा फोटो पाठवून त्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर शेळके यांच्या संबंधित बँक खात्यावर ५० हजार रुपये आले. दोन अनोळखी व्यक्तींनी त्याबाबतचा मेसेज शेळके यांना दाखविला. त्यांच्या म्हणण्यानुसार तामिळनाडू येथील कडलोर जिल्ह्यातील व्यक्तीकडून शेळके यांच्या खात्यात पैसे आले होते. त्याबाबत शेळके यांनी खातरजमा केली. खात्यात पैसे आल्याने शेळके यांनी दोन अनोळखी व्यक्तींना तेवढी रोख रक्कम दिली.
राँग ट्रान्जेक्शन
दरम्यान, २१ जून २०२३ रोजी कृष्णा शेळके एक फोन आला. तुमच्या बँक खात्यामध्ये राँग ट्रान्जेक्शन झाले असून, चुकीची अमाऊंट क्रेडिट झालेली आहे, असे शेळके यांना फोनवरून सांगण्यात आले. त्यामुळे शेळके यांनी त्यांच्या बँकेत धाव घेतली. मात्र, संबंधित खात्यावर राँग ट्रान्जेक्शन झाल्याबाबत बँकेला इ-मेल प्राप्त झाला होता. तामिळनाडू जिल्ह्यातील कडलोर जिल्ह्यातून या ट्रान्जेक्शनबाबत ‘सायबर’ तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार संबंधित ‘सायबर’ पोलिसांकडून बँकेला इ-मेल करण्यात आला. त्यामुळे शेळके यांचे खाते ‘फ्रिज’ करण्यात आले.
खात्यावरील व्यवहार सुरळीत कसे होणार?
कृष्णा शेळके यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. असे असतानाही दोन अनोळखी व्यक्तींनी रीतसर प्रक्रिया करून व्यवहार केला. त्यानंतर यांच्या खात्याबाबत शेळके यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
माझे खाते बंद झाल्याने मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. माझे आणि कुटुंबीयांचे मनोबल खचत आहे. बँकेच्या नियमानुसार मी प्रक्रिया पूर्ण करून व्यवहार पूर्ण केला. तरीही माझे खाते बंद केले. माझी चूक काय आहे?, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मला न्याय द्यावा.
कृष्णा शेळके, व्यावसायिक, कुदळवाडी, चिखली