राहुल कलाल, पुणेअमूक एका कंपनीचे औषध घ्या... इथेच तपासण्या करा..असे सांगून ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या डॉक्टरांवर ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) कारवाईचा बडगा उगारल्याने आता काही डॉक्टरांनी ‘कायद्या’चा आधार घेत ‘कट प्रॅक्टिस’चा नवा ‘फंडा’ सुरू केला आहे. आपली औषधे डॉक्टरांनी विकावीत, म्हणून औषध कंपन्यांनीच डॉक्टरांना कन्सल्टंट म्हणून नेमण्याचा धंदा सुरू केला आहे. यासाठी दोघांमध्ये सामंजस्य करारही केले जाऊ लागले आहेत. यापोटी डॉक्टरांना परदेशीवारी कंपन्या घडवून आणत आहेत.कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर एमसीआय वेळोवळी कारवाईचा बडगा उगारत आली आहे. नुकतीच फेब्रुवारीमध्ये अनेक डॉक्टरांवर कारवाई करीत, एमसीआयने त्यांची परवानगीच रद्द केली होती. याचा धसका डॉक्टर आणि औषध कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या कट प्रॅक्टिसला कायद्याचा आधार देण्याचा नवा फंडा औषध कंपन्यांनी शोधून काढला आहे. या अंतर्गत प्रयत्न ‘सामंजस्य करारा’च्या माध्यमातून डॉक्टरांना अमूक कंपनीचे औषध रुग्णांना सांगण्याचा रस्ता मोकळा होत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही वर्षांत आजार वेगाने वाढत गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक आजारावर अत्याधुनिक व सर्वंकष उपचारासाठी मल्टिस्पेशॅलिटी ही नवी पद्धत प्रचलित झाली. त्यामुळे विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्याच बरोबर औषध कंपन्यांची संख्याही झपाट्याने वाढत गेली आहे. त्या डॉक्टरांनी आमच्या कंपनीचीच औषधे विकावीत म्हणून कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांना गळ घालत होते. त्याबदल्यात डॉक्टरांना कुटुंबासह परदेशीवारी, क्लिनिकचे इंटेरिअरचे काम करून देणे आदी ‘आॅफर्स’ कंपन्या डॉक्टरांना देत होते. यांना भुलून काही डॉक्टर रुग्णांना त्याच कंपनीचे औषध प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत होते. याची दखल एमसीआयने घेतली आणि अशी कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने निलंबित केले होते.या नव्या फंडानुसार औषध कंपन्या आता डॉक्टरांसोबत सामंजस्य करार करीत असून, त्यानुसार अमूक कंपन्यांची औषधे आजारावर कधी चांगली आहेत, गुणकारी आहेत, याचा प्रचार करण्याची धुरा डॉक्टरांच्या खांद्यावर देण्यात आली आहेत. त्यापोटी डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबांना औषध कंपन्या वैद्यकीय परिषदेच्या नावाखाली परदेशीवारी घडवून आणत आहेत. या नव्या क्लुप्तीमुळे डॉक्टरांना कट प्रॅक्टिसचा मोह अजूनही सुटलेला नाही आणि त्या माध्यमातून रुग्णांचे खिसे रिकामे करीत औषध कंपन्यांच्या तिजोऱ्या भरण्याचे प्रयत्न दिवसाढवळ्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉक्टरांच्या ‘कट प्रॅक्टिस’चा नवा फंडा
By admin | Published: May 03, 2015 6:00 AM