साहित्य : गोल आखण्यासाठी साहित्य.
काय साध्य होईल : वेळेचे महत्त्व लक्षात येईल.
सज्जतेसाठी घोषणा : यार यार- याराना.
खेळ खेळायचा कसा :
खेळाडूंचे समान दोन गट करावेत. त्यांना वेगवेगळी नावे द्यावीत उदा. गुलाब, चाफा. यांपैकी एका गटाला गोलावर पूर्ण उभे करावे व दुसऱ्या गटाला बाहेरून प्रत्येकाशेजारी एक हाताचे अंतर घेऊन उभे राहण्यास सांगावे. म्हणजेच गोलावर जोड्या जोड्या होतील. नंतर शिक्षकांनी यार यार म्हणावे व खेळाडू पाठीमागे 'याराना' म्हणत एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गोलात पळू लागतील. अचानक शिक्षकांनी शिट्टी वाजवावी. त्या वेळी सुरुवातीला जे जोडीदार = एकमेकांशेजारी उभे होते, त्यांना शोधून ताबडतोब जोडीला घेऊन गोलात ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे बसतील. दुसरी शिट्टी मिळताच जर कोणी उभा असेल किंवा जोडीदार चुकेल तो बाद होईल. बाद झालेले खेळाडू खाली गोलात बसतील.