पुणे : सध्याची पिढी मोबाईल, टीव्ही अशा माध्यमांत वाहत जात आहे. वाचन, लेखन, साहित्य, भाषा याकडे तरुण पिढीचे लक्ष नाही. भाषा ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे सीमेवरील लोक आपल्या भाषेचा अभिमान बाळगतात, त्याचप्रमाणे आपणही सर्वांनी आपली मातृभाषा मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे; मात्र नवीन पिढी हे विसरत चालली असल्याची खंत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. नवीन पिढीने मराठी भाषा लिहिण्यास, बोलण्यास शिकायला हवी, असे त्या म्हणाल्या.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांचा मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंडळाच्या अध्यक्ष उज्ज्वला गोखले, कर्णबधिर नृत्यांगना प्रेरणा सहाणे आणि डॉ. उज्ज्वला सहाणे उपस्थित होत्या. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुरुषांबरोबरच महिलाही अग्रेसर आहेत. पुरुष हा युद्ध आणि व्यवहारात पुढे असला, तरी महिला प्रेम आणि मायेची भाषा बोलते. प्रत्येक महिलेच्या अंगी मायेची नवी भाषा असते. यामुळेच आपल्या मुलावर उत्तम संस्कार होत असतात. नवीन पिढीने मोबाईलपेक्षा वाचनाकडे लक्ष द्यायला हवा. मला ही गोष्ट मान्य आहे की, काळानुसार वाचनाची पद्धत बदलत आहे. लेखन ही एक पिशवी आहे. त्या पिशवीत काळानुसार लेख भरत गेले, तर त्या लेखांचे ओझे होत नाही; पण लेखनाला जर आपण लिहिलेले झेपले नाही. तर त्या ओझ्याने पिशवी फाटून जाते. मीसुद्धा एक लेखिका आहे. कालानुरूप मी माझ्या लेखनशैलीत अनेकदा बदल केले. सत्कारानंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कर्णबधिर नृत्यांगना प्रेरणा सहाणे यांचा ‘प्रेरणा द साऊंड सायलेन्स’ हा अनोखा कार्यक्रम पार पडला.