बारामती (पुणे) : शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बारामती अग्रेसर बनली आहे. नवीन पिढीने त्याचा फायदा घ्यावा. दर्जेदार शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
शिक्षण महर्षी डॉ.पी.ए. इनामदार एकता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, ज्याची कष्ट करण्याची, ज्ञानसाधना व नवनवीन जाणून घेण्याची तयारी असते. तिथे यश हमखास मिळते. समाजात शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने ही संस्था शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी पवार यांनी विद्या प्रतिष्ठानतर्फे शाळेला ५० लाख रुपयांचा धनादेश दिला. या संस्थेला मी ५० लाखाचा वैयक्तिक निधी दिला नसून विद्या प्रतिष्ठानमार्फत दिलेला आहे. ही देणगी नाही, तर शिक्षण निधी आहे. पैशाच्या व्याजातून ज्यांना शाळेची फी देता येत नाही, अशा समप्रमाणात मुला-मुलींच्या शिक्षणासाठी चांगला विनियोग करण्याची सूचना पवार यांनी केली.
पवार म्हणाले, पी.ए. इनामदार यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आज त्यांचा महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात नावलौकिक आहे. या शाळेला सुद्धा त्यांनी वेळोवेळी २ कोटी रुपयांची मदत केलेली आहे. मुलांना संधी मिळाली की, मुलं काही करू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पी.ए. इनामदार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनी मुस्लिम समाजासाठी नेहमी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
सत्कार शाळेचे अध्यक्ष आल्ताफ सय्यद यांनी केले. सचिव परवेज सय्यद यांनी चित्रिकरणाद्वारे संस्थेचा आढावा घेतला. प्रास्ताविक एकता स्कूलचे अध्यक्ष आल्ताफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे यांनी, तर आभार सुभान कुरैशी यांनी मानले.
यावेळी मुस्लिम बँकेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार, उद्योजक विठ्ठल मणियार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पौर्णिमा तावरे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, सतीश खोमणे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, ॲड. शिरीष कुलकर्णी, सत्यव्रत काळे, नवनाथ बल्लाळ, सिद्धनाथ भोकरे, उद्योजक आ.पी.इनामदार, तरन्नुम सय्यद, फकरूशेठ बोहरी, दिलीप ढवाण, हाजी कमरुद्दीन सय्यद, बबलू सय्यद, इक्बाल शेख, सादिक लुकडे, बाळासाहेब पाटील, धनंजय जामदार, भारती मुथा आदी उपस्थित होते. शिक्षण महर्षी डॉ.पी.ए. इनामदार एकता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात शरद पवार यांना सन्मानित करण्यात आले.