पुणे : उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद््घाटन होत असतानाच जोरदार पाऊस झाल्याने गळती झालेल्या महापालिकेच्या नव्या सभागृहातील अपघातप्रसंगांची मालिका मंगळवारी पहिल्याच सभेच्या वेळीही कायम राहिली. सभा सुरू असतानाच घुमटाच्या वरच्या बाजूने अचानक एक लाकडी तुकडा खाली पडला. त्यानंतर मध्येच फायर अलार्म वाजू लागला. नंतर तर सभागृह नेत्यांचे स्वीय सहायकच पाय घसरून पडले.सभेत भाषणे सुरू असतानाच मनसेचे वसंत मोरे बसले होते त्याठिकाणी अचानक घुमटावरून अचानक झालेल्या या प्रकाराने सर्व नगरसेवक वर पाहू लागले. मागील घटनेची पार्श्वभूमी असल्यामुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी लगेच चकित होत हा काय प्रकार आहे, म्हणून विचारणा केली. त्यावर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी काही नाही, लहान तुकडा पडला असे सांगितले.दरम्यानच्या काळात भाजपाचे नगरसेवक जयंत भावे हेल्मेट घेऊन आलेले शिंदे यांनी पाहिले. आपल्या जागेवरून उठून ते भावे यांच्या इथे गेले व त्यांनी ते हेल्मेट आणून आपल्या डोक्यावर घातले. काही वेळाने अचानक शिंदे यांच्याच मागील बाजूने फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा सगळे चकित झाले. मात्र, अलार्म लगेच थांबला.इमारतींचे काम सुरू होते. सभा असल्यामुळे लिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. त्यांना सेन्सर बसवले असल्यामुळे सुरू असलेल्या कामात धूरसदृश काही झाल्याने गजर वाजत होता हे नंतर स्पष्ट झाले.
नव्या सभागृहात छतावरून ठोकळा पडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 3:15 AM