पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातून कोयत्याने गुन्हे घडू लागले आहेत. शहराबरोबरच उपनगर आणि ग्रामीण भागात तरुण आणि मुले कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत. किरकोळ करणावरून झालेल्या वादात कोयत्याचा सर्रास वाप होतोय. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन तो कशासाठी घेत आहे, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घातले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात कोयता पडू नये, म्हणून पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी नवी शक्कल लढविली आहे. कोयते विकणाऱ्यांना कोणताही परवाना लागत नाही. मात्र, कोण आणि कशासाठी कोयते विकत घेतो, याची नोंद विक्रेत्यांना करायला सांगण्यात आले आहे. कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन तो कशासाठी घेत आहे, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.
दोन दिवसापूर्वीच बाजीराव रस्त्यावर एका अकरावीच्या मुलावर कोयत्याने वार झाले होते. त्या अगोदरही सिंहगड रस्ता परिसरात कोयता घेऊन धुमाकूळ घालणाऱ्याला पोलिसांनी चोपले होते. येरवडा भागात अल्पवयीन मुलांकडून कोयता घेऊन दहशत निर्माण करण्यात आली होती. शहरात असे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नसल्याच्या चर्चा नागरिक करू लागले आहेत. मध्यंतरी पोलिसांनी पुण्यातील कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली होती. तरीही गुन्हेगारी कमी झाली नाही. आता मात्र नवी शक्कल लढवत पोलिसांनी कोयता विकत घेणाऱ्याची आधार कार्ड व माहिती ठेवणे बंधनकारक केले आहे.