पुणे : शहर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या सर्व विभागांतील सर्व अधिकारी व सेवकांची रॅपिड कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार याची अंमलबजावणी करण्यात येत असून, आरोग्य अधिकाऱ्यांनी रॅपिड चाचणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बुधवारी हे आदेश देण्यात आले. या बैठकीला महापालिका आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना रॅपिड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस पालिकेतील सर्व विभागांसह १५ क्षेत्रीय कार्यालयात विशेष पथकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत.
रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी...
शहरातील पावसाळी वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या रोगांबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या बरोबर संपर्कात येत असल्याने संसर्गाचा धोका बळावतो, त्यामुळे पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. सजीव वावरे यांनी दिली.